Tuesday, April 14, 2020
उमदी पोलीस ठाण्याकडे 26 पदे रिक्त
32 पोलिसांची 48 गावांवर नजर
उमदी,(प्रतिनिधी)-
सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवरचा ताण वाढला असून त्यांना 24 तास ड्युटी सांभाळावी लागत आहे. संचार बंदी लागू करण्यात आल्याने पोलिसांना जमाव होऊ नये, म्हणून सतर्क राहावे लागत आहे. जत तालुक्यातील उमदी पोलीस ठाण्याकडे असलेल्या पोलिसांच्या कमतरतेमुळे त्यांच्यावर अतिरिक्त ताण आला आहे. याठिकाणी तब्बल 26 जागा रिक्त आहेत.
जत तालुक्यात 118 महसूल गावे असून जत आणि उमदी अशी दोन पोलीस ठाणे आहेत. पूर्व भागात महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या उमदी पोलीस ठाण्याकडे तालुक्यातील 48 गावांचा समावेश आहे. उर्वरित70 गावे जत पोलीस ठाण्याकडे आहेत. उमदी पोलीस ठाण्याकडे 48 गावांच्या संरक्षणाची जबाबदारी असली तरी इथे मंजूर 68 पदांपैकी 32 पदे भरण्यात आली आहेत. तर तब्बल 26 पदे रिक्त आहेत. 32 पैकी काही रजा, कोर्टाची कामे,जयंती-उत्सवसाठी पोलीस तैनात करावे लागतात. शिवाय काही मुख्यालयी ठेवावे लागतात. अशा परिस्थितीत अगदी कमी संख्येवर 48 गावांच्या संरक्षणची जबाबदारी येऊन पडली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण येऊन पडत आहे.
सध्या कोरोना व्हायरसने सगळीकडे थैमान घातले आहे. सध्या सर्वत्र संचार बंदी लागू आहे. अशातही काही गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत तर काही रिकाम टेकडे लोक विनाकारण गावातून फिरत आहेत. यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्याबरोबर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्त कठोरपणे ठेवावा लागत आहे. त्यामुळे पोलिसांवर ताण आला आहे. शिवाय उमदी पोलीस ठाण्याकडे एकच चार चाकी वाहन आहे. उमदी पोलीस ठाण्याची हद्द कोकण फाटा ते व्हसपेटपर्यंत आहे. अंतर जास्त आहे. अशा परिस्थितीतही पोलीस आपली कामगिरी बजावताना दिसत आहेत.
"संख्याबळ कमी असल्याने बंदोबस्त व इतर कामे करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आहे त्या लोकांवरही कामाचा अतिरिक्त कामाचा भार पडतो. पण तरीही सर्वजण मोठ्या जबाबदारीने काम करत आहेत."- दत्तात्रय कोळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उमदी पोलीस ठाणे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment