जत पूर्व भागातील चित्र; येळवी, उमदी, संखला डॉक्टरांची प्रतीक्षा
जत,(जत न्यूज नेटवर्क)-
जत पूर्व भागातील येळवी, उमदी व संख या तीन आरोग्य केंद्रांना महिनाभरापासून वैद्यकीय अधिकारीच नाहीत. वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने या आरोग्य केंद्रांची 'असून अडचण, नसून खोळंबा' अशी स्थिती झाली आहे. सध्या जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासकाच्या ताब्यात आहे. तीन आरोग्य केंद्रांना वैद्यकीय अधिकारी नसल्याने सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मोफत तपासणी व औषधोपचार होतात. आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी अकरा महिन्याच्या करारावर येतात व करार संपला की इथून निघून जातात, अशी स्थिती आहे. जत पूर्व भागातील तीन आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी पद रिक्त असल्याची ही पहिलीच घटना आहे. जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असूनही प्रशासक याकडे लक्ष देत नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. पदे रिक्त असल्याने केंद्रांची वाताहात झाली आहे. या केंद्रांना शासनाकडून औषध पुरवठा केला जातो. केंद्रांना तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता असते. मात्र कायमस्वरूपी या तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक होत नाही. अधिकारी नसल्याने कुटुंब शस्त्रक्रिया बंद आहेत. अधिकारी नसल्याने गरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे. येळवी,उमदी आणि संख या ठिकाणी दोन वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त आहेत. या जागा भरण्याची मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment