शिवपुत्र संभाजी’ हे महानाटय़ घेऊन अभिनेते डॉ. अमोल कोल्हे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. नुकतेच संभाजीनगर आणि नाशिक येथे प्रयोग झाले आहेत. आजवर या महानाटय़ाचे दोनशेहून अधिक प्रयोग झाले आहेत. मनोरंजनाच्या बदललेल्या विविध पैलूंचा आणि काळानुरूप विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाचा डोळस विचार करून महानाटय़ात अनेक बदल करण्यात आले आहेत. ‘जाणता राजा’ या महानाटय़ाने स्वत:चा एक वेगळा दर्जा प्रस्थापित केला आहे. यातही भव्यदिव्य नेपथ्य आणि नेत्रदीपक रोषणाईवर भर देण्यात आला. आजच्या घडीला ‘शिवपुत्र संभाजी’ हे महाराष्ट्रातील सगळय़ात मोठे महानाटय़ असून, ते मनोरंजनासोबत आपला इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवत आहे. नाटक व महानाटय़ात काही मर्यादा असतात. एकाच दिवशी 10 हजार रसिकांना ते दाखवता येऊ शकते. 2012 साली हे महानाटय़ आले होते. आज 2023 मध्ये ते पुन्हा अवतरले आहे. ‘शिवपुत्र संभाजी’ महानाटय़ाचा सलग सहा दिवस सारखाच प्रयोग असतो. अमोल कोल्हे म्हणतात की माती, माता व मातृभूमी यांची सेवा, रक्षण आणि त्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी ही प्रेरणा छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासातून मिळते. महेंद्र महाडिक लिखित व दिग्दर्शित ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाटय़ात छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून ते बलिदानापर्यंतचा इतिहास व सर्व टप्पे मांडले आहेत. महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांचा आणि संहितेचा अभ्यास करून कला दिग्दर्शक महेश कुडाळकर यांनी 18 एकर परिसरात डोळे दिपवून टाकणारे भव्यदिव्य असे तीन मजली किल्ल्याचे नेपथ्य, सहा स्तरांचा रंगमंच आणि शिवसृष्टी उभारली आहे. अग्निरोधक असणारे हे संपूर्ण नेपथ्य फायबर व लोखंडाचे आहे, जे कुठेही दुमडून घेऊन जाता येऊ शकते. सर्व ऐतिहासिक गोष्टींचा अभ्यास करून आणि सुरुवातीला सर्व भूमिकांचे चित्र रेखाटून वेशभूषाकार गणेश लोणारे यांनी महानाटय़ातील सर्व भूमिकांची वेशभूषा साकारली आहे. या महानाटय़ादरम्यान होणारी रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी सर्वाचे लक्ष वेधून घेते. तर राज्याभिषेक सोहळा, छत्रपती संभाजी महाराजांची घोडेस्वारी आदी विविध प्रसंगांसाठी रंगमंचासह मैदानाचाही वापर करण्यात आला आहे. या महानाटय़ाची संपूर्ण टीम ही तब्बल सव्वाचारशे जणांची आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारली असून डॉ. गिरीश ओक, प्राजक्ता गायकवाड, महेश कोकाटे, अजय तपकिरे, रमेश रोकडे, विश्वजीत फडते आदी कलाकारांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. तर प्रयोगानुसार स्थानिक कलाकारांनाही महानाटय़ात संधी दिली जाते.
No comments:
Post a Comment