Saturday, February 4, 2023

जत तालुक्यात क्रॉप पॅटर्न बदलू लागला

आंबा, द्राक्षे, पेरू, सीताफळ, बोर, ड्रॅगन फ्रूट बागांचे क्षेत्र वाढू लागले

जत,(जत न्यूज नेटवर्क)-

जत तालुक्यात क्रॉप पॅटर्न बदलू लागला आहे. शेतकऱ्यांची वेगवेगळ्या फळबागा व पिकांची प्रयोगशीलता वाढली आहे. या भागातील शेतकरी आता आंबा, द्राक्षे, ड्रॅगन फ्रूट, सीताफळ, बोर, पेरू, केळी या फळबागांसह पालेभाज्या आणि नगदी पिकांकडे वळला आहे. 

कायमस्वरूपी दुष्काळी भाग असलेल्या जत तालुक्यात आता चित्र पालटत आहे. गेल्या तीन चार वर्षांपासून होत असलेला दमदार पाऊस आणि पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये पोहचलेले कृष्णेचे पाणी यामुळे तालुक्यात पाण्याची पातळी वाढली आहे. बहुसंख्य तलावांमध्ये पाणी आहे. त्यामुळे परिस्थिती बदलली आहे. 15 वर्षांपूर्वी या भागातील शेती निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती. त्यावेळी शेतकरी , ज्वारी, मका, बाजरी, कापूस ही पिके घेत होते. यातून भरघोस उत्पादन मिळणे कठीण होते. पोटापूरते धान्य यायचे. अशा परिस्थितीत 1990 च्या दरम्यान जत तालुक्यात डाळींब पिकाचा प्रयोग यशस्वी झाला. तेव्हापासून दुष्काळी माळरानावर डाळींबाच्या बागा फुलू लागल्या. 

अलीकडच्या काही वर्षांत तर येथील क्रॉप पॅटर्न पूर्ण बदलूनच गेला. येथील शेतकरी फळबागा आणि ऊस लागवडीकडे वळला. जत तालुक्यात आता सुमारे नऊ हजार हेक्टर डाळींबबागा आहेत. येथील डाळींबाला चांगली मागणी आहे.  मध्यंतरी तेल्या रोगामुळे डाळींब बागा संपू लागल्या आहेत. यामुळे डाळींबाला पर्याय म्हणून आता आंबा, बोर याशिवाय द्राक्ष, पेरू आणि ड्रॅगन फ्रूट यांच्या लागवडीचेही प्रमाण वाढले आहे. सीताफळाचे क्षेत्रही वाढू लागले आहे. 

यंदाही पाऊस चांगला झाला असल्यामुळे या भागात ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. या भागातील शेतकऱ्यांची प्रयोगशीलता व कष्ट करण्याची तयारी यामुळे शेतकरी वेगवेगळ्या नगदी पिकांची लागवड करीत आहे. विविध फळबागांचे तसेच फळभाज्यांचे प्रयोग होऊ लागले आहेत. त्यातून तालुक्याचा क्रॉप पॅटर्न बदलू लागला आहे. ज्या दुष्काळी पट्ट्यात शेतकऱ्यांना पावसाच्या अनुमानवर पिके घ्यावी लागत होती. तेथे आता फळबागा फुलू लागल्या आहेत. या भागातून आता पुणे, मुंबईला मिरची, शेवगा, वांगी, मेथी, कोथिंबीर आदी पालेभाज्यांना विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवले जात आहेत.

1 comment:

  1. सांगली जिल्ह्यात हळद 1600 हेक्टरवर लागवड.

    ReplyDelete