Tuesday, February 7, 2023

गावांच्या विविध समित्यांचे अस्तित्व कागदावरच

विकासावर परिणाम; रुबाब मिरवण्यासाठीच पदे

जत, (जत न्यूज नेटवर्क)-

गावच्या सर्वांगीण विकासात सरपंच, उपसरपंच; तसेच सदस्य समितीबरोबर महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या गावपातळीवरील विविध समित्यांचे अस्तित्व आता फक्त कागदावरच दिसत आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी समित्यांच्या निवडी होत आहेत. मात्र, गावात रूबाब मिरवण्यासाठीच काहीजण पदे घेताना दिसत आहेत. समित्यांचे अस्तित्व कागदावर न राहता गावच्या विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पदाधिकाऱ्यांनी योगदान देणे तितकेच महत्त्वाचे आहे. 

ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासनाकडून प्रतिवर्षी गावखेड्यांना लाखो रुपयांचा निधी दिला जात आहे. गावाच्या सर्वांगीण विकासात ग्रामपंचायतीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. ग्रामविकासात ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य समितीची भूमिका महत्त्वाची आहे. गावपातळीवर स्थापन करण्यात आलेल्या विविध समित्यांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा असतो. पंचायतराज कायद्यात अभिप्रेत असलेल्या सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या उद्देशाने या समित्या नियुक्त केल्या जात असतात, महात्मा गांधी तंटामुक्‍त गाव समिती, संयुक्‍त वन व्यवस्थापन समिती, शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामआरोग्य पोषण, पाणीपुरवठा स्वच्छता समिती, बालविवाह प्रतिबंधक कायदा समिती, आपत्ती व्यवस्थापन समिती, कर आकारणी समिती, सामाजिक लेखापरीक्षण समिती, ग्राम बाल संरक्षण समिती, लाभार्थी  स्तर उपसमिती, ग्रामदक्षता समिती, जैवविविधता व्यवस्थापन समिती, ग्राम कृषी विकास समिती अशा विविध समित्या नियुक्‍त केल्या जात असतात. गावाच्या शाश्‍वत विकासासाठी या समित्या महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. मात्र, दुर्दैवाने अनेक गावांमध्ये त्या केवळ नाममात्र उरल्या आहेत. 

गावगाड्यातील तंट्याचा निपटारा गावातच व्हावा, गावखेड्यातील नागरिकांनी पोलिस ठाणे, न्यायालयाची पायरी चढू नये, पोलिस यंत्रणेवरील कामाचा ताण कमी व्हावा; तसेच गावातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यास मदत व्हावी, यासाठी गावागावांत तंटामुक्‍त समित्या स्थापन केल्या. मात्र, सुरवातीच्या काळातील या समित्यांचा उत्साह आता कमी झाला आहे. आता या समित्यांचे सक्षमीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. गावातील वाद, तंटे आता पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचत आहेत. परिणामी समित्यांच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. यानिमित्ताने समित्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अनेक गावांतील तंटामुक्‍त समित्यांचे अध्यक्ष, सदस्य हे नावापुरतेच आहेत. काही ठिकाणी तर समित्याच इतिहासजमा झाल्याचे दिसून येत आहे.

अध्यक्ष-उपाध्यक्ष, सदस्य नावापुरतेच ...

 अनेक गावांतील समित्यांचे अध्यक्ष-उपाध्यक्ष, सदस्य हे नावपुरतेच ठरत आहेत. त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देऊन समित्यांची फेररचना करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर रिक्त असलेल्या जागा त्वरित भरून समितीला बळकटी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अलीकडच्या काळात अध्यक्ष, सदस्यांच्या निवडीत गावपातळीवर राजकारण सुरू झाले. प्रतिष्ठेसाठी सदस्य होत आहेत. त्यांच्यासाठी पद शोभेची वस्तू ठरत आहे, अनेकजण फक्त रूबाब मिरवणे, हा एकमेव उद्देश ठेवून पदे घेताना दिसत आहेत. 


No comments:

Post a Comment