Monday, February 6, 2023

सांगली जिल्ह्यात 631 शासनमान्य सावकार

(7 फेब्रुवारी 2023 रोजीच्या वर्तमानपत्रातील नोंदी)

अजूनही कथा, कादंबऱ्या वाचनाची आवड कायम

★ सांगली शहरामध्ये जिल्हा नगर वाचनालय, महापालिकेचे वि. स. खांडेकर वाचनालय, वखार भागातील गांधी ग्रंथालयासह राजमती सार्वजनिक वाचनालय, केडके वाचनालय व शाळा- कॉलेजमधील लायब्ररीमध्ये विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. शहरातील 106 वर्षांपूर्वीच्या गांधी ग्रंथालयात सुमारे 49 हजारांवर पुस्तके उपलब्ध असून त्यातील 90 टक्के पुस्तके ही मराठीतील आहेत. त्याखालोखाल दोन हजार गुजराती व 300 इंग्रजी व अगदी थोडी हिंदीही आहेत. येथे आजीव 1450 तर सर्वसाधारण 150 वाचक सभासद आहेत. एक पुस्तक दहा दिवस दिले जाते. नित्यनेमाने पुस्तके वाचण्याचे प्रमाण येथे कायम आहे. अनुवादित कथा कादंबऱ्या 80 टक्के, चरित्र आत्मचरित्र पाच टक्के, प्रवासवर्णने ,धार्मिक पुस्तके पाच टक्के, गूढकथा, रहस्यकथा पाच टक्के , शब्दकोश, संदर्भग्रंथ, डिक्शनरी एक टक्का लोक वाचतात. व.पू.काळे, सुहास शिरवळकर, बाबा कदम, नारायण धारप, पु. ल. देशपांडे, सुधा मूर्ती, अच्युत गोडबोले, मेघना पेठे, गौरी देशपांडे, उमा कुलकर्णी, चारुता सागर आदी लेखकांच्या पुस्तकांना मागणी कायम आहे.

★ सांगली जिल्ह्यात10 लाख 73 हजार 340 आधारकार्ड कागदपत्रे प्रलंबित आहेत. आधारकार्ड काढून 10 वर्षे झालेल्या पण अपडेशन न केलेल्या नागरिकांनी ओळख व पत्ता यासंबंधी दुरुस्ती करून कार्ड अद्ययावत करायला हवे.

★ मध्यपूर्वेतील तुर्कस्तान आणि सीरिया या देशांना भूकंपाचा भीषण हादरा बसला असून यात 2300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यात 30 ते 40 हजार जण जखमी झाले आहेत. हजारो इमारती भुईसपाट झाल्या आहेत. 7.8 रिष्टर क्षमतेच्या या भूकंपाचे केंद्र तुर्कस्तानातील गाझियानटेप शहराच्या उत्तरेला होते. धक्के इराण ते इराणपर्यंत जाणावल्याचे सांगण्यात आले.

★ भारतीय संगीतकार रिकी केज यांनी तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कार स्वतःच्या नावावर केला. रिकी यांना त्यांचा अल्बम 'डिव्हाइन टाईडस' साठी गौरविण्यात आले आहे. 

★ नौदलाच्या वैमानिकांनी 6 फेब्रुवारी 2023 रोजी आयएनएस विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेवर लाइट कॉम्बॅट एअरक्राप्टचे यशस्वी लँडिंग केले. 

★ सांगली जिल्ह्यात 631 शासनमान्य सावकार

सांगली जिल्ह्यात शासनाकडे नोंद असलेले 631 सावकार कार्यरत आहेत. त्यांना रितसर सावकारीचा परवाना देण्यात आला आहे. यापूर्वी हीच संख्या 667 वर होती. यातील काहींनी नूतनीकरण केले नाही. त्यामुळे परवाना रद्द करण्यात आला आहे. मात्र नोंदणीकृत सावकारांपेक्षा खासगी सावकारांची संख्या अधिक आहे. अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला पैसे देऊन नंतर त्याला लुबाडूनच व्याजाची वसुली केली जाते. उपनिबंधक कार्यालयाकडे अर्ज केल्यानंतर अवघ्या 500 रुपयांत सावकारीचा परवाना मिळतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या मार्गदर्शक सूचनेनुसार कर्ज देण्यास मुभा आहे. मात्र त्यासाठी व्याजदरही ग्राहकांना परवडणारा असतो. मात्र सावकारांकडून 10 टक्के व्याजाने पैशाची वसुली केली जाते. सहकार विभागाकडून सावकारीचा परवाना दिला जातो. त्यात निर्धारित व्याजापेक्षा जादा वसुली केल्यास पोलिसांकडून कारवाई होते. खटला दाखल झाल्यानंतर पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी खासगी सावकारीविरोधात मोहीम राबवली होती. वर्षभरात 51 तक्रारी आल्या होत्या आणि 28 जणांवर कारवाई करण्यात आली होती. 

★ जत येथे शिवाजी विद्यापीठ अंतर्गत झालेल्या आंतरविभागीय सायकलिंग स्पर्धेत जतच्या संदेश मोटे याने तृतीय क्रमांक पटकावला. औरंगाबाद येथे होणाऱ्या ऑल इंडिया सायकलिंग स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. 


No comments:

Post a Comment