Thursday, January 5, 2023

डॉ. रवींद्र आरळी: एक चतुरस्र व्यक्तिमत्व


फारच थोडी माणसं असतात, ज्यांना सगळ्या कला अवगत असतात. डॉ. रवींद्र आरळी त्यापैकी एक. रुग्णांना वैद्यकीय सेवा देता देता राजकारण, समाजकारणात लीलया वावरत असताना शैक्षणिक संस्था उभा करणं, आजार, रोग यांबाबतीत लोकांमधले समज- गैरसमज दूर करण्यासाठी गावोगावी जाऊन व्याख्यानं देणं किंवा त्याबाबत पुस्तक लिहिणं अशी कितीतरी कामं ते सहज पार पाडतात. आता तर त्यांनी जतला आयुर्वेदिक महाविद्यालयच आणलं आहे. जतच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा शिरपेच खोवला आहे. सतत हसतमुख हसणाऱ्या डॉ .आरळी यांच्या चेहऱ्यावर कधीच कंटाळा, आळस दिसून आला नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा त्यांचा वावर थक्क करणारा आहे. डॉ. आरळी म्हणजे इतरांना प्रेरणादायी असे व्यक्तिमत्त्व आहे. नेहमी नवनव्या जबाबदाऱ्या आनंदाने स्वीकारून ते पूर्ण करत असल्याने भाजपने त्यांना सातत्याने कोणती ना कोणती नवी जबाबदारी टाकली आहे.  सध्या ते केंद्र सरकारच्या सिमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली या महामंडळाचे केंद्रीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. सतत प्रवास असतो, पण कधीही आपल्या कामाकडे दुर्लक्ष नसते.  जत येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ म्हणून ओळख असलेले आणि  राज्य शासनाचा डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार विजेते  असलेले डॉ. रवींद्र शिवशंकर आरळी म्हणजे एक चतुरस्र, अष्टपैलू  व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या कामाचा आवाका केवळ वैद्यकीय क्षेत्रापुरता मर्यादित नाही. यशाची अनेक शिखरे त्यांनी पादाक्रांत केली आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर आरोग्यनगरी म्हणून लौकिक असलेल्या मिरज येथेही त्यांनी सिनर्जी हे अत्याधुनिक व आंतरराष्ट्रीय दर्जा असलेले मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल उभारले आहे. ते जसे निष्णात डॉक्टर व उत्तम प्रशासक आहेत, तसेच ते निस्पृह राजकारणी आहेत. त्यांची राजकारणाची सुरुवात भारतीय जनता पार्टीमधून झाली. अनेक वर्षे ते एकाच पक्षात निष्ठेने काम करीत राहिले आहेत. अक्कलकोटचे दिवंगत आमदार व त्यांचे सासरे बाबासाहेब तानवडे हे डॉक्टरांचे राजकीय गुरु व सामाजिक जीवनातील आदर्श आहेत. पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना थेट केंद्रीय संचालकपदी नियुक्ती केली आहे. यापूर्वी त्यांनी पक्षात अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

डॉ. रवींद्र आरळी यांचे मूळ गाव जत तालुक्‍यातील अंकलगी हे आहे. मात्र त्यांचा जन्म जत येथे झाला आहे. त्यांचे वडील शिवशंकर आरळी हे बँकेत अधिकारी होते. आई शांताबाई या अत्यंत धार्मिक व कुटुंबवत्सल होत्या. डॉक्टरांचे प्राथमिक शिक्षण जत येथे, तर माध्यमिक शिक्षण मिरज हायस्कूल, मिरज येथे झाले आहे. विलिंग्डन कॉलेज सांगली येथून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे एमबीबीएसची पदवी संपादन केली. स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र या विषयातील त्यांनी उच्चपदवी घेतल्यानंतर मोठ्या शहरामध्ये न जाता त्यांनी जतसारख्या ग्रामीण व दुष्काळी भागामध्ये वैद्यकीय सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. हा धाडसी निर्णय त्यांनी सार्थ ठरवला आहे. 

गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ सुरू असलेले जतमधले किंबहुना जिल्ह्यातील सर्वात मोठे स्त्रीरोग व बाळंतपणाचे रुग्णालय आहे. त्यांनंतर त्यांनी उमा हॉस्पिटल, शांताबाई शिवशंकर आरळी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, मिरज येथील सिनर्जी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, शांताबाई  शिवशंकर आरळी आयुर्वेदिक हॉस्पिटल अशी रुग्णालयांची मालिका त्यांनी उभी केली आहे. ग्रामीण भागामध्ये त्यांनी गायनकॉलाजी विषयातील पदव्युत्तर शिक्षणाचे केंद्र सुरू केले आहे. उमा नर्सिंग कॉलेज, बीएससी नर्सिंग, डीएमएलटी, लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल अशा अनेक संस्था सुरू केल्या आहेत. सर्वात आनंदाची बाब म्हणजे जत येथे त्यांनी शांताबाई शिवशंकर आरळी आयुर्वेदिक हॉस्पिटल व आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजची स्थापना केली आहे. नुकतीच या आयुर्वेदिक महाविद्यालयाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे जत तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर वैद्यकीय शिक्षणाची सोय झाली आहे. सीइटी सेलच्या माध्यमातून याठिकाणी ऑनलाईन प्रवेश मिळवता येणार आहे. शंभर विद्यार्थी क्षमतेचे  कॉलेज असून यासाठी योग्य ती व्यवस्था , विद्यार्थ्यांच्या राहण्याची उत्तम सोय, तज्ज्ञ कर्माचारी उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे जतच्या वैद्यकीय क्षेत्राला सुवर्ण झळाळी प्राप्त झाली आहे. डॉ. रवींद्र आरळी हे चतुरस्र व्यक्तिमत्व आहे. ते एक उत्कृष्ट वक्ते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध आहेत. एक उत्कृष्ट वक्ता एक उत्कृष्ट नेता होऊ शकतो, हे त्यांनी सिद्ध केले आहे. अत्यंत मार्मिक भाषा, विनोदाची झालर, अभ्यासपूर्वक मांडणी, अनुभवातून साकार झालेली मधुरवाणी यामुळे त्यांची गणना सध्याच्या आघाडीच्या वक्त॒यांमध्ये होते. अनेक व्याख्यानमालांमध्ये त्यांनी मानाचे स्थान प्राप्त केले आहे. काही वर्षांपूर्वी जतमध्ये एड्सचे सर्वाधिक रुग्ण होते. त्यावेळी डॉक्टरांनी अगदी गावोगावी जाऊन या विषयावर व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन लायन्स क्लबने त्यांना पुरस्काराने सन्मानित केले आहे. 

डॉ. आरळी यांना समाजकारणाची आवड पहिल्यापासूनच होती. जत शहरात लायन्स क्लबची स्थापना प्रथम त्यांनीच केली. या लायन्स क्लबच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे केली आहेत. त्यात वृक्षारोपण, एडस्‌ विषयावर व्याख्याने, आरोग्यावर व्याख्याने तसेच दुष्काळात पिण्याच्या पाण्याच्या टाक्या वाटप, ब्लँकेट वाटप आदी उपक्रम राबविले. लायन्स क्लबच्या माध्यमातून जत तालुक्यात दुष्काळ काळात बरीच कामे झाली आहेत. पाणी टंचाईवर मात करण्यात त्यांचाही हातभार लागला आहे. 

डॉ. रवींद्र अरळी यांनी आहारशास्त्र, आरोग्य, स्त्रियांचे आजार, अंधश्रद्धा, आजाराबाबत व आरोग्याबाबतचे अज्ञान, कॅन्सर अशा अनेक विषयांवर हजारांहून अधिक व्याख्याने दिली आहेत. महिलांच्या आरोग्यविषयक शंका व गैरसमज या विषयावर त्यांनी समज-गैरसमज हे अतिशय माहितीपूर्ण व संग्रही ठेवावे असे पुस्तक लिहिले आहे. सामाजिक बांधिलकी जपत स्त्रीरोग, वंध्यत्व, नेत्ररोग, दंतरोग, मधुमेह, ज्येष्ठांची तपासणी अशी अनेक मोफत शिबिरे, रक्तदान शिबिरे, मोफत औषध वाटप असे सामाजिक उपक्रम राबविले आहेत, ग्रामीण भागात आरोग्य विषयक व्याख्यानमाला अखंडपणे चालवून राज्यातील अनेक तज्ञांचे मार्गदर्शन जतकरांसाठी उपलब्ध करून दिले आहे. लायन्स क्लब, लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट, जीवनरेखा ब्लड बँक, बसवेश्वर शिक्षण संस्था, उमा इन्स्टिट्यूट आफ नर्सिंग एज्युकेशन, उमा इंग्लिश मीडियम स्कूल, धनलक्ष्मी पतसंस्था, उमा चॅरिटेबल ट्रस्ट, शांताबाई शिवशंकर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल,जत, सिनर्जी सुपर स्पेशलिटी हास्पिटल, मिरज, शांताबाई अरळी आयुर्वेदिक हॉस्पिटल व कालेज, जत अशा अनेक संस्थांचे ते संस्थापक आहेत. वैद्यकीय व्यवसाय अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळून त्यांनी यशाची अनेक शिखरे सर केली आहेत. एक राजकारणी म्हणून ही त्यांचे काम अतिशय आदर्शवत असे आहे. भाजपचे ते सुरुवातीपासून एकनिष्ठ सभासद आहेत .भाजपचे तालुकाध्यक्ष ,जिल्हा उपाध्यक्ष, प्रदेश कार्यकारणी सदस्य, पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष, सांगली अर्बन बँकेचे उपाध्यक्ष अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. अतिशय व्यस्त असतानाही त्यांनी केलेली समाजसेवा, विविध उपक्रम हे खरेच न उलगडणारे कोडे आहे. सर्वच क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे .म्हणून डॉ. रवींद्र आरळी म्हणजे एक किमयागार आहेत. असे अभिमानाने नमूद करावे लागते. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 


No comments:

Post a Comment