जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
दहा आणि त्यापेक्षा कमी पटाच्या शाळांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. शालेय शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी ऑनलाईन'वेबिनार' मध्ये दहा आणि त्यापेक्षा कमी पटाच्या ज्या शाळा आहेत, त्या शाळांच्या आसपासच्या शाळा आयडेंटिफाय करून ठेवण्याच्या सूचना दिल्या आहे. सांगली जिल्ह्यात कमी पटाच्या 121 शाळा आहेत.
जिल्हा परिषदेच्या 112 शाळा, खासगी अनुदानित एक, खासगी विनाअनुदानित9 आणि नगरपालिका1 अशा शाळांचा समावेश आहे. लॉक डावूनच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाकडून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. सध्या ऑनलाईन वेबिनार सुरू आहेत. नुकत्याच झालेल्या एका ऑनलाईन वेबिनार मध्ये सर्व जिल्ह्यांमधून गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, डाएटचे अधिव्याख्याते, मोबाईल टीचर यांनी या वेबिनारमध्ये ऑनलाईन सहभाग घेतला.
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड तसेच शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक यांनी वेबिनारमध्ये अनेक विषयांवर माहिती दिली. अतिरिक्त मुख्य सचिवांनी दहा आणि दहा पेक्षा कमी पटांच्या शाळांचा विषय उपस्थित केला. या शाळांच्या समायोजनाच्या अनुषंगाने जवळची शाळा आयडेंटिफाय करून ठेवा, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यामुळे हा विषय पुन्हा ऐरणीवर आला असून या शाळांवर संक्रात येणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे शिक्षक आणि त्यांच्या संघटनांचा शाळा बंद करण्याला विरोध आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2009 नुसार प्रत्येक बालकाला त्याच्या घरापासून एक किलोमीटरच्या आत प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. कमी पटाच्या शाळा बंद केल्यास या कायद्याची पायमल्ली होईल, असे संघटनांचे म्हणणे आहे.
सांगली जिल्ह्यात दहा आणि त्यापेक्षा कमी पटाच्या शाळांची संख्या 121 आहे. यात सर्वात जास्त शाळा जत तालुक्यातील असून इथे 33 शाळा आहेत. आटपाडी 24, शिराळा 22, वाळवा 10, खानापूर 10, कवठेमहांकाळ7, कडेगाव 6, तासगाव 5, मिरज 3, पलूस 1 अशा शाळांचा समावेश आहे. या शाळा बंद करून या शाळेतील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत शिफ़्ट केल्यास शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत.
No comments:
Post a Comment