खरेच ऑनलाईन अभ्यासाची लहान मुलांना गरज आहे का...? मला असे वाटत नाही.. बऱ्याच शाळा ऑनलाईन सुरू झाल्या. ऑनलाईन लेक्चर, ऑनलाईन छंदवर्ग, ऑनलाईन स्पेशल ट्युशन वगैरे वगैरे..... पण यात तुमच्या लक्षात येते आहे का की मुले बरेच तास । स्क्रीनसमोर आहेत... आणि याच स्क्रीनसाठी ते पॅनिक होत आहेत... तुमचे खरेच आहे की लॉकडाऊनमुळे ही परिस्थिती आपल्यावर ओढवलेली आहे... पण काही पालकांना ही याचे अप्रूप आहे. आमची मुले ऑनलाईन अभ्यास करतात, याचे समाजमाध्यमावर फोटोही टाकले... छान.... पण यातून निर्माण होणाऱ्या गंभीर परिणामांचे काय? मुलांचे डोळे आणि मेंदू आजारी होत आहे...
मुलांना शिक्षकांची गरजच वाटेनाशी होत आहे. आता काय सगळेच यूट्यूबवर आहे...
कशाला माहिती डोक्यात साठवा, असेही मुले सहज म्हणतात. मी या शिक्षणाच्या विरोधात नाही; पण लहान मुलांच्या डोक्यात इतक्या झपाट्याने आदळतंय की ती मुलं बिचारी कावरीबावरी झाली आहेत. त्यात आता परिस्थितीमुळे मुलं २४ तास घरात आहेत मग मनोरंजनासाठी टीव्ही, मोबाईल ओघाने आलेच. बापरे...
मुलांच्या कल्पकतेला, सृजनतेला आपण वेळ देत आहोत का? अनेक तत्त्ववाद्यांचे, शिक्षण तज्ज्ञांचे असे मत आहे की शांततेत अनेक तत्व सृजनता फुलते...
मुलांना शांतता द्या.. त्यांना रिकामा वेळ द्या. ती मुले स्वतःच आपले खेळ निर्माण करतात, नवीन कल्पना प्रत्यक्ष उतरवण्याचा प्रयत्न करत असतात आणि ती जेव्हा खेळ निर्माण करतात तेव्हा ते अभ्यासच करत असतात. शिकवण्यापेक्षा स्वतःच्या चुकांतून, अनुभवातून शिकण खूप मोलाचे आहे. रवींद्रनाथ टागोर, विनोबा भावे, महात्मा गांधी यांचे फक्त गोड़वे न गाता त्यांची शिक्षणपद्धती अमलात आणण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे...... काय माहिती आज पालकांना ऑनलाईन अभ्यासाची गरज भासवून त्यांना पॅनिक करून, ऑनलाईन अभ्यास नाही केला तर मुलं 'ढ' राहतील असा बिनबुडाचा धोका निर्माण करून, काही राहतील असा बिनबुडाचा धोका निर्माण करून लोक करोडो कमवत नसतील ना?... याचा विचार करा...
आपण सुजाण पालक आहोत. सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहोत.. आई आणि बाबा म्हणून वेळ देऊया मुलांना... माझ्यात व्यक्ती म्हणून जे चांगले आहे ते देऊया ना आपण मुलांना. पहिली संगीताची गुरू त्यांची आईच आहे. इथे खूप उदाहरणे देता येतील. विज्ञान क्षेत्रात, कला क्षेत्रात अशी अनेक उदाहरणे आहेत की त्यांच्या उत्कर्षाचा पाया त्यांच्या आई वडिलांनी उभा केला आहे.
वडील तबलावादक आहेत मुलाला शिकवा, आई छान स्वयंपाक करते, शिकवा. अक्षर सुंदर असणे, रांगोळी छान काढणे, कपाट नेटके लावणे, अवांतर वाचन करणे, खेळ खेळणे, बुद्धिबळ, नवा व्यापार शिकवणे. मुलांना मनाचे श्लोक, गीतापठण, निबंध लेखन, गणित, तुमची मातृभाषा शिकवा. फार गरज आहे आता... गाणी, नृत्य, कविता लिहिणे, गोष्ट सांगणे आणि तयार करणे इत्यादी...
एक माझ्या ओळखीतले गणितज्ज्ञ आहेत. एकदा त्यांना विचारले कशी काय गणितात आवड निर्माण झाली? तर ते म्हणाले, की माझे बाबा रोज एक गणित फळ्यावर मी उठायच्या आत लिहून ठेवत आणि ते सोडवल्यावरच खाली खेळायला सोडत असत. रोज वेगळा विचार वेगळं गणित मजा येत असे... यातच गोडी लागली... जेवणाआधी रोज पाढे.. बऱ्याच गोष्टी आहेत हो ज्या आपण मुलांना शिकवू शकतो आपल्या भावनांचा स्पर्श असतो तिथे. आपले मातृत्व आणि पितृत्व आपण देत असतो. थोडक्यात संस्कारांची शिदोरी आपण या शिकवण्यातून देत असतो. सोपे सांगायचं तर कालिटी टाईम द्या मुलांना आपण स्वतः जे काही शिकवतो त्याद्वारे आपण नसल्यावरही आपण त्याच्याबरोबर असू... सतत... त्यांच्या सुंदर आठवणींत... विचार करा आणि या ऑनलाईनच्या गुदमरून टाकणाऱ्या, ताण देणाऱ्या शिक्षणापेक्षा आपला वेळ, सहवास त्याना देऊया. कारण नोकरीमुळे आई-बाबांना मुलांसाठी वेळच नसतो. ही चांगली संधी आहे मुलांना समजून घेण्याची आणि आइ-बाबा काय आहेत हे कळवून देण्याची... मुलांशी बोला, गप्पा मारा, त्यांचे मित्र बना... मुलं फार लवकर मोठी होतात हो... वेळ नाही देत आपल्याला...
(कला साहित्य परिवार या ग्रुपवरील पोस्ट)
No comments:
Post a Comment