जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
गेल्या चाळीस दिवसांपासून लॉक डाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच वाहने जाग्यावर थांबून आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यात या चाळीस दिवसांत वाहन अपघातांमध्ये घट आली आहे. एप्रिल महिन्यात फक्त 19 अपघातांची नोंद झाली आहे. 2019 हीच संख्या 62 इतकी होती.
21 मार्च पासून राज्यात सर्वत्र लॉक डाऊन जाहीर करण्यात आला. यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली. त्याचबरोबर कामानिमित्त नागरिकांना वाहने बाहेर काढण्यास मुभा देण्यात आली. कामाशिवाय बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यामुळे फारच कमी वाहने रस्त्यावर दिसू लागली. वाहने थांबून राहिली. आता लॉक डावूनचे काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ दिसू लागली आहे आणि त्याचबरोबर अपघाताच्या घटनाही घडू लागल्या आहेत. कालच संख ( ता.जत ) येथे झालेल्या वाहन अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. कुपवाडजवळ आणि वाळवा तालुक्यातील रेठरेहरणाक्ष येथेही प्रत्येकी एकजण ठार झाला आहे तर नेर्ले जवळ पुणे-बेंगलोर महामार्गाजवळ टेम्पो उलटून पडला आहे. आता वाहन अपघातांना सुरुवात झाली, असेच म्हणायला हवे.
2019 मध्ये जानेवारी महिन्यात 75 अपघात झाले. यात 34 मृत्यू तर 75 जखमी झाले होते. 2020 च्या जानेवारी महिन्यात 65 अपघात झाले. यातील मृत्यूची संख्या 34 आणि जखमींची संख्या 48 आहे. 2019 च्या फेब्रुवारी मध्ये 64 अपघात झाले. यात 24 मृत्यू,48 जखमी झाले. 2020 च्या फेब्रुवारी मध्ये 79 अपघात झाले त्यात 48 मृत्यू आणि 49 जखमी झाले. मार्च 2019 मध्ये 84 अपघात झाले त्यात 25 मृत्यू, 78 जखमी झाले.मार्च 2020 मध्ये 56 अपघात झाले. 19 मृत्यू आणि 33 जखमी. याच महिन्यात लॉक डाऊन जाहीर झाला. त्यामुळे अपघाताची संख्या घटलेली दिसते.
एप्रिल2019 मध्ये 62 अपघात झाले होते. यात 27 मृत्यू आणि 52 जखमी झाले. तर मार्च 2020 मध्ये फक्त 19 अपघात झाले. यात 11 मृत्यू आणि 12 जखमी झाले. अजूनही रस्त्यांवर वाहने कमी आहेत. मात्र लॉक डाऊन संपूर्णपणे संपल्यावर मात्र वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
No comments:
Post a Comment