Sunday, May 31, 2020

कवी महादेव बुरुटे : उभं आयुष्यच लाॅकडाऊन

ध्यानीमनी नसताना भारतात कोरोना व्हायरस ने छुपा प्रवेश केला आणि त्याच्या विघातकतेमुळे माणसांचं जगणंच सावधगिरीचा उपाय म्हणून लॉकडाऊन झालं. पायाला आधुनिकतेची चक्रं बांधलेल्या सर्वांना घरात कोंडून ठेवल्यासारखे झाले आहे. पण ही वेळच अशी आहे - आपल्यासाठी, घरच्या लोकांसाठी, आपल्या लाडक्या मुलाबाळांसाठी हे आज गरजेचे आहे. चाळीस एक दिवस ही अवस्था अनुभवत असताना लोकांना बांधून घातल्यासारखे झाले आहे. पण उभं आयुष्यच ज्याच्या नशिबी लॉकडाऊन आहे त्यांचं काय? असेच आपल्या दुर्दम्य इच्छाशक्ती व  ध्येयनिष्ठेने वाटचाल करीत आपलं असह्य जीवन विविध लोकोपयोगी, समाजाभिमुख मार्गानी सुसह्य करीत हसतमुखाने परिस्थितीला सामोरे जाणारे  शेगांव येथील कवी, साहित्यिक महादेव बुरुटे.
दोन्ही पायांनी आणि संपूर्ण शारीरिकदृष्ठ्या जवळपास 100 टक्के दिव्यांग असलेल्या बुरुटेंचे वय  पन्नाशी गाठून पुढे गेले आहे. अगदी त्यांना  कळायच्याही आधीपासून हा भयंकर वाटणारा लॉकडाऊन त्यांचा पिच्छा पुरवतोय. पण प्राप्त संकटाशी सामना करत  मोठ्या जिद्दीने आनंदी वाटचाल हा अवलिया जगतो आहे. त्यातूनच जमेल तसे लोकांच्याही उपयोगी पडण्याची प्रयत्न करतो आहे. संकटे घर करून राहत नाहीत. अडीअडचणी संपतील. लवकरच सर्व काही सुरळीत होईल. थोडा संयम पाळा. सूचनांचे पालन करा. घरातच रहा. वाचन, लेखनासारखे आपापले छंद जोपासून या परिस्थितीचा सामना करुन हे संकट हरवा. आपल्या विचारपूर्वक कृतीतून ते नक्की हरणार आहे याची खात्री बाळगा. असा धिराचा सल्ला ते आपल्या कृतीतून देत आहेत.
लहानपणीच पोलीओचा घाला पडला आणि दोन्ही पायांनी अपंगत्व आले. शाळेत जायच्या वयात १९७२ च्या दरम्यान लोक आपल्या धडधाकट मुलांना शाळेत पाठवायची मारामार. मग यांना कोण पाठवणार ? त्यात अडचण अशी होती, की त्यांना रोज शाळेत उचलून न्यावे आणावे लागणार होते. शेतकरी, शेतमजूर कुटुंबाला हे जरा कठीण होते. परिणामी वयाच्या एक दोन वर्षे उशिराच त्यांनी हट्टच धरल्याने घरच्यांनी शाळेत त्यांचे नाव दाखल केले. वडील कै. बाबासाहेब भुजंगा बुरुटे रोज शाळेत नेण्या-आणण्याचे काम त्यांच्या कामातून वेळ काढुन नियमित करायचे. त्यांनी ही तपश्चर्या अखंड बारा वर्षे केली. त्या कर्तव्यनिष्ठेवर महादेवाचं शरीर नसलं तरी जगणं मात्र भक्कम पायावर उभे आहे. कधीतरी अडचणीला भाऊ, मित्र हे काम करायचे. मनातूनच शिक्षणाची आवड असल्याने  शिक्षणात चांगली प्रगती करीत राहिले. पहिली ते दहावी प्रथम क्रमांक कधी चुकला नाही. गुरुजनांनी त्यांच्यावर पुत्रवत प्रेम केल्याचे ते कृतज्ञतापूर्वक सांगतात. मार्च १९८३ ला त्यांनी १० वी च्या परीक्षेत ८०.२९ टक्के गुणांसह विशेष प्रावीण्य मिळविले. पण पुढे दुर्दैव आडवे आले. ते रहात असलेल्या शेगाव (ता. जत, जि. सांगली) या शहरापासून दूर असलेल्या खेड्यात पुढील शिक्षणाची सोय नव्हती. आणि  अपंगत्वामुळे ते बाहेर जाऊ शकत नव्हते. मनाची तडफड, घालमेल झाली. दोन वर्षे मोठया विमनस्क अवस्थेत गेली.
नंतर तालुक्याचे ठिकाण असलेल्या जत येथील आर. आर. कॉलेज मध्ये बहिस्थ विद्यार्थी म्हणून इ. १२ वी (कला) साठी अर्ज भरला. वर्षभर घरीच स्वतः अभ्यास केला. बोर्डाची परीक्षा सुरु झाली. शेगाव ते जत हे १३ किमी चे अंतर.  भावाला सोबत घेऊन तिन चाकी सायकलरुन जाऊन-येऊन पेपर देऊ लागले. १९ मार्च १९८६ दुपारी ३ वाजता भूगोलचा पेपर होता. नेहमीप्रमाणे भावासोबत सकाळी ८ वाजता निघाले. या मार्गावर जत पासून २-३ किमी अंतरावर कुंभारखाणी नामक तिव्र उताराचा भाग आहे. तो पार करताना पाठीमागे तिनचाकी सायकल ढकलत चालवणाऱ्या भावाच्या हातून सायकल सुटून जीवघेणा अपघात झाला. पण 'ज्याको राखे साईया, मार सके ना कोय' या न्यायाने बचावले. उजव्या डोळ्याला जखम झाली. परीक्षा केंद्रावर जाईपर्यंत आणखी काही सत्व परीक्षांना सामोरे जावे लागले. माघार न घेता मार्ग काढला. उजव्या डोळ्याला बँडेज लावून डाव्या डोळ्याच्या सहाय्याने परीक्षा दिली. प्रथम प्रयत्नात ६० टक्के गुणानी पास झाले.
शारिरीक स्थितीमुळे बाहेरगावी जाता न आल्याने पुन्हा पुढील शिक्षण थांबले. पुन्हा मनाची घालमेल झाली. पण विधीलिखितापुढे इलाज नव्हता. काही दिवस नैराश्य जाणवलं. नियतीपुढं हात टेकणं जीवावर आलं. पण सकारात्मक विचार करून 'आपण घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग करुन आपल्या तसेच जमले तर इतरांच्या जीवनात आनंद पेरण्याचा विचार केला.' ययाती सारखी अनेक पुस्तके वाचून अंतरात बालपणापासूनच असलेली लेखनाची उर्मी जागृत झालीच होती. विद्यार्थी जीवनातच लेखनाची सुरुवात केली होती. आठवीत असताना 'जत समाचार' या तालुक्यातून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिकात पहिली सामाजिक कविता प्रसिद्ध झाली. लेखनाची उर्मी आणखी जाणीव पूर्वक जोपासली.   वाळवंटी जगण्यात अक्षरे हिरवळ बनुन ओऍसिस फुलवत आली. निसर्गाचा वरदहस्त लाभल्याने अतिशय उत्तम दर्जाची निसर्ग कविता त्यांच्या लेखनितून उतरुन लागली. कल्याण इनामदार, शांता ज. शेळके, वृक्षमित्र धों. म. मोहिते यांच्यासह अनेकांना ती भावली. 'ग्लास आर्धा रिकामा आहे म्हणण्यापेक्षा तो हवेने पूर्ण भरला आहे' हा सकारात्मक दृष्टिकोन बुरुटेंच्या अंगी बाणवणाऱ्या किर्लोस्करवाडी येथील वसंतराव आपटे यांनी 'आपले जग' या साप्ताहिकात वर्षभर ऋतुरंग सदर लिहिण्याची संधी दिली. अनेक दिग्गज नियतकालिकांच्या पुरवण्यामधून सचित्र प्रसिद्धी मिळाली. राज्य तसेच देशातून अनेक मित्र, मान्यवर भेटले. त्यांच्याकडून नवे विचार, नवा दृष्टिकोण मिळू लागला. सकारात्मक दृष्टी निर्माण होण्यास आणखी मदत झाली. त्यांची आजपर्यंत आठ पुस्तके प्रकाशित झाली असून अनेक नामवंत नियतकालीकातून, दिवाळीअंकातून सुमारे चार-पाचशेच्या वर विविध विषयांवरील कविता, बालकविता, कथा, बालकथा, लेख, पुस्तक परीक्षणे, प्रस्तावना, बालशब्दकोडी, काही इंग्लिश कविता इत्यादी अनेक प्रकारचे लेखन प्रकाशित झाले आहे. बालभारतीच्या किशोर सारख्या दिग्गज मासिकात त्यांच्या बालकविता प्रकाशित होत आहेत. त्यांचे अनुभव विश्व समृद्ध आणि विस्तारित करणाऱ्या आकाशवाणीवरुनही कथा, संवाद, भाषणे, मनोगते, कविता इ. लेखन प्रसारित झाले आहे. त्यांच्या घरी येऊन आकाशवाणीने त्यांची मुलाखत घेतली आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडून प्रकाशित झालेल्या रानपालवी  कवितासंग्रहास ख्यातनाम साहित्यिका कै. शांता ज. शेळके यांनी प्रस्तावना लिहिली आहे. विश्वस्तरीय लेखन स्पर्धेतही त्यांचे लेखन पात्र ठरले आहे. त्यांच्या लेखनाची एक वेगळी शैली असून सकस साहित्यनिर्मिती आहे. असे असूनही त्यांच्या लेखनास म्हणावा तेवढा न्याय मिळाला नाही असे वाटते. त्यास त्यांचे अडवळणी खेड्यातले वास्तव्य, ग्रामीण पत्रकारांचे साहित्याविषयी होणारे थोडेसे दुर्लक्ष, दिग्गज जाणकारांचे दुर्लक्ष तसेच स्वतः त्यांची अपंगत्वामुळे न होणारी जाणकारांमधली उठबस, विचारविनिमय इ. कारणीभूत ठरले असावे. निसर्ग अभ्यासकांना संदर्भ ग्रंथ ठरावा असा वर्षभरातील विविध रंगी निसर्गाच्या अंतरगांच्या बावन्न आठवड्यांच्या बावन्न कविता मधून घेतलेल्या आढाव्याचा त्यांचा 'ऋतुरंग' हा काव्यसंग्रह आहे हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. त्यांच्या पुस्तकांची समिक्षणे अनेकांनी लिहिली आहेत. प्रकाशकाअभावी त्यांचे बरेच लेखन अजून अप्रकाशित आहे.
त्यांना अनेक साहित्य पुरस्कारांनी  गौरवण्यात आले आहे. सांगली येथे झालेल्या ८१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रीत कवी म्हणून त्यांची दखल घेतली गेली आहे. शासनाने जि. प. च्या वतीने 'दिव्यांग प्रेरणा पुरस्कार २०१८', मिरजेच्या शब्दांगण साहित्यिक व्यासपीठाने नुकतीच त्यांची दिव्यांग सन्मान साहित्य संमेलनात कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी निवड करुन त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून ते 'मराठी साहित्य सेवा मंच, शेगांव' च्या माध्यमातून साहित्य चळवळीत सक्रिय सहभागी आहेत. दहावी नंतर त्यांनी आपल्या ज्ञानाचा समाजालाही उपयोग व्हावा म्हणून चौथी बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना क्लासेसच्या माध्यमातून गणित व इंग्लिशचे नियमीत मार्गदर्शन केले आहे. त्यातील शेकडो विद्यार्थी उच्च हुद्द्यावर आहेत. संगणक स्वतःच शिकून सर्व प्रकारचे अचूक मुद्देसूद मराठी व इंग्रजी टायपींग ते लोकांना करुन देतात. विविध मार्गदर्शनासाठी आजही त्यांच्याकडे लोक सतत येत असतात. असे हे अनेक पैलू असणारा हा माणूस प्रचंड स्वाभिमानी आहे. लोकांपुढे हात पसरणे स्वभावात नाही. आत्मविश्वास हा त्यांचा श्वास आहे. स्वतःविषयी बोलताना ते म्हणतात,
   " ...... हा पट मांडण्याचा एकच उद्देश आहे; मी एक नियतिचा शापित - पुर्णतः अपंग व्यक्ती. सर्वांच्या नजरेसमोर जे एका अपंगाचं जीणं तरळतं त्यापेक्षा मी एक वेगळं मानाचं, समाजोपयोगी जीणं जगतो आहे. माझ्या या म्हणण्यात कदाचित आत्मप्रौढी जाणवेलही पण मी प्रामाणिकपणे सांगतो की, मला दुसऱ्यानी उचलून नेल्याशिवाय आजही कुठे बाहेर जाता येत नाही. थोडक्यात मी आयुष्यच लॉकडाऊन जीवन जगतो आहे. तरीही मी संकटावर केलेली मात, आणि सर्वांकडून त्यास मिळालेली मनःपूर्वक साथ, शब्दांची आराधना, मी घेतलेलं शिक्षण आज मला कशाचीच खंत भासू देत नाही. शिक्षणाचा मला खूप फायदा झाला आहे. आजही माझा प्रत्येक दिवस लेखन, वाचन, शिकवणी, संवाद यात कसा गेला कळतच नाही. माझ्या अपंगत्वाची आठवणही येत नाही आणि खंतही वाटत नाही मी आता पन्नाशी ओलांडली आहे. अजूनही अनेक अडचणींच्या सत्व परीक्षा देतोच आहे. विश्वासपूर्ण जिद्दीने पासही होतो आहे."
 जीवनातली कटुता त्यांच्या लेखणातून कुठेच आक्रस्ताळेपणाने वाचकांसमोर न येता संयमी स्वभाव दिसतो. आजची त्यांची शारीरिक अवस्था प्रत्यक्ष बघितली तर बघणारा आपसूकच दिग्मुढ झाल्याशिवाय राहणार नाही. आज त्यांना स्वतः कोणतेच काम करता येत नाही. अगदी अंथरुणातून उठणे, जेवणे सुद्धा. सर्व कामे घरचे करतात. आज त्यांना स्वतःच्या हातांनी लिहिताही येत नाही. मोबाईल आज त्यांना वरदान ठरला आहे; कारण उजव्या हाताच्या फक्त अंगठ्याने ते सर्व टायपींग करतात. फोनवरच ते स्वतःचे लेखन करणे, लोकांची पत्रे, अर्ज टाइप करणे, आॅनलाईन उतारे वगैरे काढणे व वाय फाय प्रिंटरवरुन प्रिंट काढून देणे, सल्ला, मार्गदर्शन यात दिवसभर व्यस्त असतात.त्यांच्या या जिद्दीला सलाम!

20 comments:

  1. मनापासून धन्यवाद मच्छिंद्रजी.
    महादेव बी.बुरुटे

    ReplyDelete
  2. प्रबळ इच्छाशक्ती सरांची, आदर्श व्यक्तिमत्व बुरुटे सर... !

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद

      Delete
  3. अत्यंत प्रेरणादायी प्रवास! सलाम त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीला..!

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद
      महादेव बी. बुरुटे

      Delete
  4. Great Mahadev. I am fortunate ro be your classmate feom 1st to 10th std.
    Proud to be your bench partner and i am 100% convinced that your company help me to shape my education and used to be 2nd rank student - most of the time.

    Yours is great inspirational story ..keep it up. Stay blessed, stay happy

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद.
      महादेव बी. बुरुटे

      Delete
  5. प्रतिकूल परिस्थितीवर त्यांनी मात केली आहे.यापुढेही त्यांचा आत्मविश्वास वाढत राहील व दीर्घायुष्य मिळेल.

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद. महादेव बी. बुरुटे

      Delete
  6. Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद. महादेव बी. बुरुटे

      Delete
  7. जबरदस्त खुप मेहनत केली आहे काका तुम्ही..... मी आज मला नशीबवान समजतो तुमच्या जीवनाचा गोष्ट वाचून मजा डोळयात पाणी आलं आणा (माझे आजोबा )नी तुम्हाला चक्क बारा वर्ष खांद्यावर घेऊन शाळॆला नेले न तुम्ही पहिला नंबर कधी सोडला नाही वा...... ते म्हणतात ना पाची बोट सारखी नसतात काय तर कमी जास्त असत..... तुम्हाला खुप खुप शुभेच्छा..... माझा सलाम तुमच्या जिद्दीला.... Proud of you kaka keep it up stay happy.... 😄😄

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. महादेव बी. बुरुटे

      Delete
  8. मास्तर आपणास सर्वप्रथम धन्यवाद. महादेव हे अजब रसायन आहेत. अपंगत्वावर त्यांनी जिद्दीने मात केली आहे. आपण योग्य शब्दात सर्व मांडले आहे

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद. महादेव बी. बुरुटे

      Delete
  9. कृपया कमेंट देताना आपले नाव सुद्धा लिहा. कारण कोणाची कमेंट आहे हे कळत नाही. अननोन असे नाव पडते. त्यामुळे शेवटी तुमचे नाव लिहा

    ReplyDelete
  10. सलाम तुमच्या जिद्दीला....100% दिव्यांग असून सूध्दा तुम्ही खचला नाहीत ....तुमच्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे आमचेसारखे दिव्यांगाना.धन्यवाद अ.व.आटपाडकर क.महांकाळ

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद सर

      Delete
  11. सर्वांचे मनापासून धन्यवाद
    महादेव बी. बुरुटे

    ReplyDelete
  12. महादेवच्या ह्या खडतर प्रवासाच्या थोड्याशा अंतराची मीही साक्षीदार आहे,त्याच्या जीवनकार्यास खूप खूप सदिच्छा🙏

    ReplyDelete