जत,(प्रतिनिधी)-
आपल्या सभोवताली जे घडते, आपण जे पहातो, अनुभवतो आणि आपण जे वाचन करतो त्यातून आपले व्यक्तीमत्व तर घडतेच, पण त्यातून आपली भाषा समृद्ध होण्यासाठीही मदत होते. त्यासाठी सर्वांनी वाचन, मनन, निरीक्षण आणि जाणीवपूर्वक मराठीचा वापर केला पाहिजे, असे मत कवी लवकुमार मुळे यांनी मराठी साहित्य सेवा मंच, शेगांव व कविवर्य नारायण सुर्वे कवी मंच, रड्डे यांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शेगाव येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
कवी रावसाहेब यादव म्हणाले, 'कविवर्य कुसुमाग्रजांची कविता ही विविध सामाजिक पैलूंवर भाष्य करीत अभिव्यक्तीच्या माध्यमातून थेट मनाची पकड घेत काव्यानंद देते.' 'ग्रामीण भागात जीवंत अनुभव मांडणारे कवी, लेखक आहेत; पण त्यांना ते पुस्तकरूपाने आणण्यासाठी खूपच अडचणी येतात. असं साहित्य प्रकाशात आणण्यासाठी लोकांनी अशी पुस्तके विकत घेऊन ती विविध समारंभात भेट द्यावीत. यातून नक्कीच ग्रामीण साहित्य निर्मिती व भाषा विकासास गती मिळेल' असे मत साहित्यिक, कवी महादेव बुरुटे यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रसिद्ध लेखक मच्छिंद्र ऐनापुरे व शालेय विज्ञान प्रदर्शनात राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शेगाव येथील विद्यार्थी वेदांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या' गोष्टी स्मार्ट बालचमूंच्या' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यानंतर झालेल्या काव्य मैफिलीत रावसाहेब यादव, रशिद मुलाणी, लवकुमार मुळे, महादेव बुरुटे, रवि सांगोलकर यांचेसह अनेकांनी विविध स्वरूपाच्या कविता, वात्रटिका, चारोळ्या सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. बाप या कवितेच्या गेय गायनाने कवी रावसाहेब यादव यांनी वेगळीच उंची गाठली.
या कार्यक्रमात दिपप्रज्वलन व ग्रंथ पूजन शफिक इनामदार, मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या हस्ते, स्वागत लेखक महादेव बुरुटे, प्रास्ताविक रशिद मुलाणी व रवी सांगोलकर यांनी आभार मानले. यावेळी कवी मारुती घोडके, धनाजी पाटील यांच्यासह अनेक काव्य रसिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment