Wednesday, February 26, 2020

शाळेत मराठीची सक्ती योग्य, भाषा विकासासाठी हवे प्राधिकरण

मराठीच्या संवर्धनासाठी व्यापक उपाययोजनांची गरज : मराठीतील विविध बोलीभाषांचेही व्हावे जतन
जत,(प्रतिनिधी)-
मराठी ही आपली मातृभाषा. अमृतातेही पैजा जिंके, असे मराठीचे वर्णन संत ज्ञानेश्‍वरांनी केले आहे. मात्र, आज मराठीची अवस्था काय आहे? मराठीला वैभवाचे दिवस आणण्यात आपण सर्व तिची लेकरे कमी पडत आहोत. शासकीय कामकाजात मराठी भाषा असली तरी ती घरातून मात्र हद्दपार होत आहे. आता शासनाने अभ्यासक्रमात मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे मराठीच्या संवर्धनाला हातभार लागेल. पण केवळ एवढय़ावर भागणार नाही तर मराठीसाठी स्वतंत्र प्राधिकारणही हवे, अशी मागणी केली जात आहे.

सांगलीतील साहित्यिक कवी दयासागर बन्ने म्हणाले, आज जगातील अनेक भाषा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. अशावेळी मायमराठीच्या संवर्धनाच्या आणि संरक्षणाच्या जबाबदारीची जाणीव प्रत्येक मराठी माणसाला आणि सरकारलाही होत राहावी यादृष्टीने २७ फेब्रुवारी या मराठी राजभाषा दिनाला फार महत्त्व आहे. राज्यातील सर्व प्रकारच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची केली जाणार, हे शासनाने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यामुळे ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे या भाषिक कौशल्याच्या चतु:सूत्रीत प्रत्येक विद्यार्थी सक्तीने बांधला जाईल. यानंतरची जबाबदारी तिथे शिकवणार्‍या भाषा शिक्षकांची आहे. शब्दांची समृद्धी , जपणूक आणि मराठीच्या वाड्मयीन आभिरूचीच्या विकासासाठी वाचनाची आवड ते विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा निर्माण करू शकतील. कवी लवकुमार मुळे  यांनी मराठीविषयीच्या अनास्थेला शासनाची धोरणे जबाबदार असल्याचा प्रहार केला. मराठीला विकासाची भाषा करणारे अर्थकारण आणि विकासकारण केले तरच अनास्था दूर होईल. मराठी शाळा बंद होणे ही त्याचीच परिणती आहे. त्या इंग्रजीसाठी बंद केल्या जात असल्याचेही श्री. मुळे यांनी नमूद केले.
मराठीला हवा अभिजात दर्जा
मराठीकडे दुर्लक्ष कोणी जाणीवपूर्वक करत नाही मात्र, द्यावे तेवढे लक्ष या स्थितीमुळेच दिले जात नाही. बोलीभाषा सामान्यांची, ग्रामीणांची केवळ मराठी आणि मराठीच आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळायला हवा. अभिजात दर्जा मिळाल्याने भाषेचा वारसा, संचित पुढच्यांसाठी जपला जाईल. त्यासाठी मराठीला अभिजात दर्जा मिळायलाच हवा, अशी आग्रही मागणी होत आहे.
बोलीभाषांना द्यावे नवजीवन
आभिजात साहित्य परंपरा असलेली मराठी भाषा ही बहुजनांचीही बोलीभाषा आहे. त्यासाठी मराठीतील विविध बोलीभाषांचे जतन होणे गरजेचे आहे. कोणतीही भाषा ही नदीच्या पात्राप्रमाणे समृद्ध दिसत असली तरी, त्या लोकमातेला बोलीभाषांचे विविध प्रवाह जीवनरस पुरवत असतात. मराठी भाषेला सुंदर करणार्‍या अनेक बोली आहेत, ज्या जीवनरीतींचे सत्त्व पिऊन निर्माण झाल्या आहेत. त्या त्या प्रदेशातील सांस्कृतिक संचित, लोकसाहित्य , लोकरंगभूमी, लोककला आणि लोकपरंपराही आपल्यासोबत विविध बोली प्रवाह वाहून आणत असतात. मराठीच्या प्रमाणभाषेसोबतच या बोलींनाही विविध उपक्रमांद्वारे नवजीवन देत राहणे हे गरजेचे असल्याचे महादेव बुरुटे यांनी नमूद केले.
शासन आपल्या प्रदीर्घ पाठपुराव्यामुळे आता कुठे मराठी १0 वी पर्यंत सक्तीची करण्याचा कायदा करत आहे. आपण ती १२ वी पयर्ंत सक्तीची करण्यात आली पाहिजे असे म्हणतो आहोत. मराठी माध्यमांच्या बंद पडलेल्या शाळा सुरू व्हायला हव्यात. पुन: नव्या बंद व्हायला नकोत. मराठी विद्यापीठ ताबडतोब स्थापन व्हायला हवे. मराठी भाषा विकास प्राधिकरण कायदा करायला हवा. त्याचबरोबर राज्यातील सर्व प्रकारच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची केली जाणार हे शासनाने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यासाठी मराठीतील विविध बोलीभाषांचे जतन होणे गरजेचे आहे. बोलींनाही विविध उपक्रमांद्वारे नवजीवन देत राहणे हे गरजेचे आहे.
सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात अजून अनेक गावांमध्ये मराठी माध्यमाच्या शाळा नाहीत.ही मोठी शोकांतिका असून शासनाने याकडे लक्ष घालून मराठी शाळा सुरू करण्यासाठी आग्रही राहिले पाहिजे, अशीही मागणी होत आहे.


No comments:

Post a Comment