Tuesday, February 25, 2020

मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या 'गोष्टी स्मार्ट बालचमुंच्या' पुस्तकाचे प्रकाशन

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या 'गोष्टी स्मार्ट बालचमुंच्या' बालकथा संग्रहाचे प्रकाशन कुपवाड (सांगली) येथे पार पडलेल्या सहाव्या जिल्हास्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलनात 'किशोर' मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांच्याहस्ते पार पडले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सांगली), दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा (कोल्हापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने सहावे विद्यार्थी साहित्य संमेलन कुपवाड (सांगली) नवकृष्णा व्हॅली  येथे पार पडले. यावेळी लेखक,शिक्षक आणि पत्रकार असलेल्या मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या 'गोष्टी स्मार्ट बालचमुंच्या' या बालकथा संग्रहाचे प्रकाशन झाले.
किरण केंद्रे, लेखक पृथ्वीराज तौर यांच्याहस्ते प्रकाशन झाले. यावेळी संमेलनाध्यक्ष गौतम पाटील,नामदेव माळी,दयासागर बन्ने, शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग 'डाएट' चे प्राचार्य डॉ. रमेश होसकोटी, शिक्षक संघटनांचे बाबासाहेब लाड,अमोल माने, श्री. गुरव,बाळासाहेब गायकवाड,  शशिकांत नागरगोजे, शोभा ऐनापुरे, आसावरी ऐनापुरे, अनिकेत ऐनापुरे,डॉ. विकास सलगर, मुश्ताक पटेल, डॉ.अंजली रसाळ विजयकुमार पाटील, सर्जेराव लाड,बाळासाहेब कटारे,अविनाश गुरव, सुमेध कुलकर्णी, अक्षरदीप प्रकाशनचे वसंत खोत, महादेव हेगडे, अनिल सावंत, भानुदास सावंत, विनायक शिंदे, शरद नेजकर, संतोष कदम,तुकाराम  गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी किरण केंद्रे म्हणाले की, सांगली जिल्ह्यात बालसाहित्याची चळवळ दृष्ट लागावी अशा पद्धतीची सुरू असून अन्य जिल्ह्याने याचे अनुकरण करण्याची गरज आहे. नामदेव माळी,दयासागर बन्ने यांनी बालसाहित्यिक घडवण्याची फार मोठी कामगिरी सुरू ठेवली आहे. त्यांच्या कार्याला शुभेच्छा. सांगली जिल्ह्याची एका नव्या प्रवाहाची सुरू असलेली वाटचाल कौतुकास्पद आहे. प्रारंभी स्वागत समृद्धी नागरगोजे हिने केले. सूत्रसंचालन समृद्धी कुरणे, वेदांत अंबोळे यांनी केले.
श्री. ऐनापुरे यांचे 'गोष्टी स्मार्ट बालचमुंच्या' हे पाचवे पुस्तक आहे. यापूर्वी हसत जगावे, जंगल एक्स्प्रेस, मौलिक धन,सामान्यातील असामान्य ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा मच्छिंद्र ऐनापुरे या नावाने स्वतंत्र ब्लॉग असून यात त्यांच्या सुमारे पंधराशे लेखांचा समावेश आहे.

(मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या 'गोष्टी  स्मार्ट बालचमुंच्या' पुस्तकाचे प्रकाशन किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांच्याहस्ते झाले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.)

No comments:

Post a Comment