Wednesday, January 18, 2023

रोल मॉडेल ग्रामपंचायतींना हवा निधीचा बूस्टर

सांगली,(जत न्यूज नेटवर्क)-

लोकशाहीत जनतेशी थेट जोडलेली शासकीय यंत्रणा म्हणून तसेच केंद्र, राज्य सरकार व जनता यातील दुवा म्हणजे ग्रामपंचायत. प्रशासनाची ध्येयधोरणे, लोककल्याणकारी योजना, विविध अभियाने तळागाळातील लोकांपर्यंत पोचविणारी यंत्रणा म्हणून ग्रामपंचायतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जनतेशी नाळ जोडल्यामुळे पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. महात्मा गांधींचा 'खेड्यांकडे चला' हा मंत्र जपण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. उठावदार काम करणाऱ्या ग्रामपंचायतीना निधीची कमतरता भासते. त्यामुळे भरीव निधीसाठी या ग्रामपंचायती सरकार व लोकप्रतिनिधींकडे डोळे लावून बसल्या आहेत. 

जनतेसाठी अत्यंत जवळच्या असणाऱ्या ग्रामपंचायती खडतर अवस्थेत आहेत. काही अपवादही आहेत. अनेक ग्रामपंचायतीनी उत्कृष्ट व लोकाभिमुख कामे करून जनतेला उत्तम कारभार काय असतो, ते दाखवले आहे. अशांची दखल घेऊन शासनाने त्यांचा यथोचित मानसन्मान करीत कौतुकाची थाप देखील टाकली आहे. केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी विविध पुरस्कारांच्या योजना राबवत अशा गावांना प्रोत्साहन देण्याबरोबरच बक्षीसरूपी अधिकची रक्‍कम देऊन लोकाभिमुख विकासासाठी मदत करत आहेत. उठावदार काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना जसे केंद्र व राज्य मदत करीत असते. त्याप्रमाणे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी देखील आपापल्या मतदार संघात चांगले काम करणाऱ्या ग्रामपंचायतींच्या कामाची दखल घेऊन तिथे आणखी  काम होण्यासाठी गटातटाच्या किंवा पक्षीय चौकटीच्या बाहेर जाऊन मदत करण्याची गरज आहे. ही वाजवी अपेक्षा विविध गाव कारभाऱ्यांकडून होत आहे. 

ग्रामविकासाचे अभ्यास केंद्र म्हणून सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावे पुढे येत आहेत. अलीकडे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्‍यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायत नावारूपास येत आहे. ही बाब मान्याचीवाडीसह पाटण तालुका आणि लोकप्रतिनिधोंसाठी अभिमानाची आहे. तालुक्यासह राज्यातील इतर ग्रामपंचायतोंसाठी देखील प्रेरणादायी आहे. ग्रामपंचायती बळकटीसाठी तालुक्‍यात शिवशाही सरपंच संघाची स्थापना झाली. संघाच्या माध्यमातून स्पर्धेचे आयोजन करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला. मात्र, विशेष कार्य दिसून आले नाही. 

ग्रामपंचायत कोणाच्या विचारांच्या असा दावा करण्यापेक्षा, आपल्या ताब्यातील किती ग्रामपंचायती पुढील पाच वर्षात मान्याचीवाडी होणार? यावर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा आहे. मात्र, आडवाजिरवीच्या राजकारणात विधायक गोष्टी मागे पडत आहेत. गटातटाच्या पलीकडे नेत्यांनी शाश्‍वत विकासासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. भौतिक विकास हो वर्तमानाची गरज असली, तरी शाश्‍वत विकास पुढच्या अनेक पिढ्यांची गरज आहे. त्यामुळे शाश्‍वत विकासाची कामे करणाऱ्या ग्रामपंचायतोंना लोकप्रतिनिधींनी अधिकचा निधी देणे अपेक्षित आहे. जेणेकरून भौतिक विकासाबरोबरच शाश्‍वत विकासाला देखील गती मिळणार आहे. 


No comments:

Post a Comment