Thursday, January 19, 2023

निसर्गाच्या शाळेतून विज्ञानाचे धडे

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावण्यासाठी उमेश नेवसे हे शिक्षक निसर्ग निरीक्षणावर भर देतात. ते पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामधील नसरापूर येथे राहतात आणि वेल्हे बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकवतात. ते म्हणाले, “पृथ्वीभोवती चंद्र फिरतो. कधी तो पूर्ण दिसतो, कधी अर्धा तर कधी अजिबातच दिसत नाही. हे सारे कुणाच्या शापामुळे होत नाही. यामागची कारणे वैज्ञानिक आहेत. मुलांना स्वत: निरीक्षण व त्या आधारे दर दोन दिवसांनी चंद्राची आकृती काढायला सांगून, शेवटी यामागचे वास्तव लक्षात आणून देतो. चंद्र आकाशात कोठे व त्याचा आकार कसा आहे वगैरे मुलं बघतात. पौर्णिमेनंतर चंद्राचा आकार कमी आणि अमावस्येनंतर वाढत जातो. सूर्य, चंद्र यांचे आकाशातील अंतर याला कारणीभूत असते. हा कार्यकारणभाव मुलांना या प्रयोगातून रंजक पद्धतीने कळतो. दर वर्षी सलग पन्नास दिवस हा प्रयोग चालतो. यंदाही शेवटच्या आठवड्यापासून सुरू होऊन फेब्रुवारी-मार्चपर्यंत चालेल.” 

नेवसे यांनी असेही सांगितले की, आमच्या शाळेत 'नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र' स्थापन करण्यात आले आहे. या माध्यमातून दररोज परिपाठाच्या वेळी निरनिराळे प्रयोग केले जातात. सध्या लोहचुंबकाच्या गुणधर्मावर आधारित प्रयोग चालले आहेत. मुलांना ते वाटून दिले आहेत. प्रत्येक विद्यार्थी त्याच्यावर सोपविलेल्या प्रयोगाच्या आदल्या दिवशी प्रश्‍न विचारून, चर्चा करून त्याबद्दलचे तत्त्व समजून घेतो. दुसऱ्या दिवशी परिपाठात प्रत्यक्ष प्रयोग करून पाहुन, आपले निष्कर्ष सर्वांसमोर सादर करतो. आणखी एक रंजक अभ्यास म्हणजे लॅपटॉपवर गूगल मॅपवरून आमची शाळा आम्ही बघतो. नंतर जवळचा तोरणा किल्ला, गुंजवणी धरण याचबरोबर सभोवतालची महत्त्वाची ठिकाणं आम्ही बघतो. केव्हा तरी या मॅपवरून जगातील वेगवेगळे खंड, त्यांत असलेले विविध देश, मग आपल्याकडील इतर राज्ये आदींची दृश्य सफर करतो. याचा शेवट लोणारच्या सरोवरापाशी होतो. उल्कापातामुळे तयार झालेल्या लोणार सरोवरात अनेक विवरे आहेत. त्यांचा संबंध चंद्राशी जोडून त्यावरील विवरेही दाखवतो. तीच आपल्याला पृथ्वीवरून डागांसारखी दिसतात. 

No comments:

Post a Comment