सांगली जिल्ह्याच्या चित्रकलेच्या परंपरेला
विख्यात चित्रकार श्रीपाद गोपाळ ऊर्फ पंत जांभळीकर यांच्यापासून सुरुवात होते. स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय ख्यातीप्राप्त झालेले
ते कलावंत होते. त्यांच्यापासून सुरू झालेला हा कलाप्रवास अखंडपणे
सुरू आहे. कला विश्व महाविद्यालय,
कलापुष्प संस्था यांनी त्यासाठी धडपड सुरू ठेवली आहे. पंत जांभळीकर यांचा जन्म 30 मार्च 1904 रोजी शिरोळ तालुक्यातील
जांभळी येथे झाला. लहानपणापासूनच त्यांचे सांगलीशी घनिष्ठ नाते
होते. मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये चित्रकलेचे शास्त्रशुद्ध व अॅकॅडमिक
शिक्षण घेतलेले पंत जिल्ह्यातील पहिले चित्रकार होते. सुरुवातीला
त्यांचा मुंबईतच स्टुडिओ होता. मात्र मातीच्या ओढीतून ते सांगलीत
आले. मॉडर्न आर्ट क्लासेस या नावाने मान्यताप्राप्त चित्रकलेचे
वर्ग त्यांनी सुरू केले.
ती सांगलीच्या चित्रकलेच्या पर्वाची
सुरुवात होती. या वर्गाचे गजानन रघुनाथ ऊर्फ नाना धामणीकर,
दत्तोपंत ओतारी आणि गुजर असे पहिले तीन विद्यार्थी होते. सुरुवातीच्या काळात ग.ना. जाधव,
बसवंत, ना.ह.माळी, बी. आर.शेंडगे, नार्वेकर, रंगा भागवत,
शामराव कुलकर्णी, कल्याण शेट्ये, श्रीशैल्य बोळाज, व्ही.जी.पाटील, वाटवे, शिदोरे अशा अनेकांनी
पंतांच्या मार्गदर्शनाखाली कलाध्ययन केले.
यांपैकी चित्रकला बसवंत, चित्रकार ग.ना.जाधव, चित्रकार कल्याण शेट्ये यांनी या वर्गाचे नाव कलाजगतात
रुझवले. 1943 च्या दरम्यान या क्लासेसच्यावतीने पंतांनी सांगलीत
तत्कालीन चित्रकारांचे भव्य चित्रप्रदर्शन केले होते. यामध्ये
अबालाल रेहमान, बाबूराव पेंटर, हळदणकर,
त्रिदाद, धुरंधर, बेंद्रे,
अहिवासी, देऊसकर, सातवळेकर,
आचरेकर, बाळगजबर, सॉलोमन
अशा दिग्गजांच्या कलाकृती प्रदर्शित झाल्या होत्या. या प्रदर्शनाचे
उदघाटन स्वातंत्रवीर सावरकर यांनी केले होते.
1967 मध्ये पंतांनी वयोमानानुसार मॉडर्न
आर्ट क्लासेस बंद करून त्याचं रुपांतर 1 जुलै 1968 मध्ये प्राचार्य पी.बी.पाटील यांच्या
शांतिनिकेतन येथे कलाविश्व महाविद्यालयात केले. कलाविश्वचे पहिले प्राचार्य तुळशीदास टिळवे.
छंत जांभळीकर यांनी सुरुवातीला 14 विद्यार्थी घेऊन
महाविद्यालय सुरू केले. आता या महाविद्यालयात दीडशे-दोनशे विद्यार्थी कलाध्ययन करतात. ए.टी.पाटील, शांताराम कमते,
प्राचार्य एम. के. जाधव,
प्राचार्य जी.एस. माजगावकर
यांनी अध्यापन केले. प्राचार्य जे.जी.
पैलवान यांच्याकडेही धुरा होती. कलाविश्वचे अनेक विद्यार्थी आज राज्यभरात कलाध्यापन करतात.
सुरेंद्र जगताप, गजानन कबाडे, अनिल अभंगे,
सयाजी नांगरे, अन्वर पट्टेकरी, मनोज सकळे, वैशाली पाटील, सत्यजित
वरेकर, प्रमोद कुरळेकर, फारुक नदाफ,
जे.बी.पाटील, हणमंत लोहार, सागर बोंद्रे यांनी आशयघन कलाकृतीद्वारे
राज्यात आपली मोहोर उमटवली आहे. महावीर पाटील, संजय नलवडे, प्रमोद खंजिरे, शशिकांत
जगताप, लक्ष्मण लोहार, प्रदीप पाटील,
विजय जाधव, भार्गव कुलकर्णी, मिलिंद कडणे, मधुरा सरडे, मंगेश
पाटील, रुपेश हिरगुडे यांनी विविध कलाप्रदर्शनातून स्वत:च्या कामातील सातत्य जपलं आहे. मणेराजुरीचे चित्रकार
प्रकाश हिसे सध्या बाँबे आर्ट सोसायटीचे पदाधिकारी आहेत. महादेव
कदम याने काष्ठशिल्पात तर तासगावच्या अभिजीत साळुंके याने मेटलक्राफ्टमध्ये करिअर केलम
आहे. मिरजेचे पेंटर उगारे, वाळव्याचे कुलदीप
पोतदार आणि पेठचे पेंटर लोहार यांनी होर्डिंग्ज, सायन बोर्ड करताना
इनॅमल पेंट आणि फ्लोरोसेंट रंगाचा सफाईदार प्रयोगशील वापर केला. मिरजेतील ज्येष्ठ चित्रकार आयझॅक होळकर अमेरिकेतील सॅनफ्रॅन्सिस्को येथे कला
महाविद्यालयात अध्यापक म्हणून कार्यरत होते.
अॅनिमेशनच्या क्षेत्रात ज्येष्ठ अॅनिमेटर व फिल्म डिव्हिजनच्या
अॅनिमेशन विभागाचे प्रमुख बी. आर.
शेंडगे यांच या क्षेत्रातील काम अनेकांना परिचित नाही. मात्र सलग 12 राष्ट्रपती पटकवणारे श्री. शेंडगे बुधगावला वास्तव्यास आहेत. सध्या या क्षेत्रात
भारतातील नामांकित अॅनिमेशन स्टुडिओमध्ये जिल्ह्यातील अॅनिमेटर विविध पदांवर काम करीत आहेत. यामध्ये फारुक नदाफ,
शिवानंद खानोरे, भारतभूषण होगाडे, गायत्री भोईटे, अभिजीत कुमठेकर, नीलेश चौधरी , शीला खाडिलकर, स्वाती
शेवाळे यांसारखी कितीतरी नावं घेता येतील.
व्यंगचित्रकलेच्या
क्षेत्रात सांगलीतील व्यंगचित्रकारांनी स्वत:ची एक ओळख निर्माण
केली आहे. आद्य व्यंगचित्रकार शंकरराव किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर,
स्त्री,मनोहर या नियतकालिकांमधून नियमित व्यंगचित्रे
प्रकाशित केली आहेत. आज गणेश काटकर, विजय
नांगरे, दीपक सरडे वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून व्यंगचित्रे
रेखाटत आहेत. विविध दिवाळी अंक आणि नियतकालिकांमधून ज्येष्ठ रेखाचित्रकार
सुरेश पंडित यांची शैलीदार रेखाचित्रे वाड्मयीन क्षेत्रात परिचित आहेत. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेले स्वयंभू व्यासपीठ म्हणून कलापुष्प
संस्थेने गेल्या 27 वर्षात राज्यात लौकिक प्राप्त केला आहे.
जिल्ह्यात कलाविश्वसह सावित्रीबाई बजरंग चित्रकला
महाविद्यालय (विटा), यशवंत चित्रकला महाविद्यालय
(चिखली), नवकृष्णा व्हॅली कलामहाविद्यालय
(कुपवाड) आणि राजारामबापू पातील चित्रकला महाविद्यालय
(इस्लामपूर) अशी अन्य कला महाविद्यालये आहेत.
शिल्पकला क्षेत्रात मोजक्या कलाकारांचे योगदानही असामान्य आहे.
कडेगाव तालुक्यातील कोतवडे गावचे प्रसिद्ध शिल्पकार चंद्रजीत यादव यांची
शिल्पे आणि पुतळे प्रशंसनीय ठरले आहेत. शिल्पकार संजय तडसरकर
यांचंही नाव राज्याच्या शिल्पकला क्षेत्रात आवर्जून घेतले जाते. जुन्या पिढीतील दत्तोपंत ओतारी आणि मिरजेचे सध्याचे विजय गुजर यांनी कोणतेही
शिक्षण न घेताही कामातून स्वत:ला सिद्ध केले आहे. धनगावचा नवोदित शिल्पकार महेश हरुगडे याच्या कारकिर्दीला भरभराटीला आली आहे.
प्राध्यापक असलेले लक्ष्मण लोहार दगडी मूर्तिकामात प्रसिद्ध आहेत.
No comments:
Post a Comment