Sunday, August 9, 2015

लोकसंस्कृतीचा ठेवा: वासुदेव

डोक्यावर शंकुच्या आकाराची मोरपिसांची टोपी, घोळदार अंगरखा, काखेत झोळी, कमरेला शेला, त्यात खोचलेली बासरी, पायात चाळ या वेशात रामप्रहरी ग्रामीण भागात येणार्या वासुदेवाचे दर्शन दुर्मिळ झाले आहे. वासुदेव ही महाराष्ट्रातील पारंपारिक प्रयोशील लोककला. दान पावलं, दान पावल... म्हणत दारी येणारा वासुदेव आपल्या गीतातून कृष्णभक्तीचा महिमा गातो. त्या बरोबरच घरा-घरांतील बाप-लेकाचा , दुनियेचं वर्णन रसाळ वाणीद्वारे करतो. वासुदेवाचा हजार-बाराशे वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. एका ब्राम्हण जोतिष्यास कुणबी बाईपासून झालेल्या सहदेव नावच्या मुलापासून आपली उत्पत्ती झाली, असे वासुदेव सांगतात. ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ या संतांनी वासुदेवावर रुपके केली. आद्य महानुभव वाड्मयातही याचे पुरावे आहेत. वासुदेव जातीने मराठा श्रेणीतले, परंतु त्यांच्या विशेष वृत्तीमुळे त्यांची वासुदेव स्वतंत्र जात मानली जाते.

आजही ग्रामीण भागाता यात्रा, जत्रेत वासुदेवांची स्वारी दिसते. तो कधी बाळगोपाळांच्या मेळ्यात तर कधी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकर्यांकडून धान्य घेताना दिसतो. गावात पाच-दहा रुपये दिले की, तो घराण्याचा उद्धार करतो. हे चित्र आता हळूहळू कमी होऊ लागले आहे. ग्रामीण भागातही बदलाचे वारे वाहू लागले असल्यामुळे वासुदेवाबद्दल आकर्षण कमी होऊ लागले आहे. वयोवृद्द वासुदेव हा व्यवसाय टिकवून आहेत.
सांगली जिल्ह्यात आष्टा,इस्लामपूर, भिलवडी, तासगाव, आरवडे, मिरज, सावळज, करोली एम, या गावांमध्ये वासुदेवाची कुटुंबे आहेत. यापैकी काही कुटुंबे आर्थिकदृट्या स्थिरावली आहेत. नोकरी व्यवसायाकडे वळली आहेत. हे प्रमाण अत्यल्प आहे. आजही पालात राहून भटकणारा समाज मोठा आहे. काही वासुदेवांना अद्याप हक्काची घरे नाहीत. त्यांची मतदारयादीत नावे नाहीत. त्यांच्या मुलांना जातीचा दाखला मिळवताना कसरत करावी लागते. त्यांच्या स्त्रियांना मोलमजुरीचीच कामे करावी लागतात. सामाजात जात पंचायत, रुढी-परंपरा यांचा पगडा कायम आहे. बाराशे वर्षांची परंपरा असणारी वासुदेव लोककला जोपासणारे कलावंत भविष्य नसल्यामुळेच दुर्मिळ होत चालले आहेत.


No comments:

Post a Comment