Sunday, August 9, 2015

रामप्रहरी गाव जागविणारा: पिंगळा जोशी

अंगात तीन बटनी शर्ट. त्याच्यावर कोट, धोतर, डोक्यावर पटका, पटक्याला चंद्रकोर, एका हातात कंदील व दुसर्या हातात कुडमुडे. काखेत झोळी अशा वेशात भल्या पहाटे दारात येऊन भविष्य कथन करणारा पिंगळा जोशी. ही एक भटकी जमात आहे. यांनाच कुडमुडे जोशी म्हणतात. पहाटेच्या वेळी झाडावर पक्षी बोलतो. त्या पक्षाची भाषा समजून हा जोशी भविष्य कथन करतो, असा समज आहे. त्यामुळे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात.


सिद्धनाथा,भोलेनाथा दारी आलो आता, लई वर्षातनं ,लई दिवसातनं आलोय आयो.
अशी आरोळी देत तो घरातल्या जोत्यापासून येतो. घरातील स्त्रीधर्म घेऊन येते. तिचे भविष्य कथन करतो. स्त्रिया खूश होऊन त्याला धर्म घालतात. त्याला जुने लुगडे, धोतर, सदराही मिळतो. ही मंडळी पूर्वी एका गावात पाच दिवस मुक्काम करीत. गावाच्या माळावर पाल ठोकून यांचं वास्तव्य असे. पहाटे चारपासून सकाळी सातपर्यंत गावातून फेरी मारून मिळेल तो धर्म घेत अद्यापही ग्रामीण भागात वर्षातून एकदा याचे दर्शन घडते. सध्या चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे या लोकांना जवळच्या पोलिस ठाण्यात हजेरी देऊन गावात फिरावे लागते. आता त्यांची नवी पिढी अन्य व्यवसायाकडे वळली आहे. त्यामुळे वयोवृद्ध लोकच हा व्यवसाय जोपासत आहेत.
सांगली जिल्ह्यात मूळचे पिंगळा जोशी लोक नाहीत. मात्र सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातून येऊन येथे स्थायिक झालेले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील नराळे या गावातून 30 ते 35 वर्षांपूर्वी पिंगळे लोक येथे आले. मिरजेला मेढीमळा येथे 100 कुटुंबे आहेत. जतमध्येही 100 कुटुंबे आहेत. आष्टा,इस्लामपूर डफळापूर, भिलवडी येथे प्रत्येकी दहा-बारा घरे आहेत. मात्र अध्याप अनेकजण उघड्यावर पालं ठोकून आहेत. त्यामुळे जातीचे दाखले मिळत नाहीत. मुलांना शिक्षणात अडथळा येत आहे. त्यामुळे शासकीय सुविधांपासून हे लोक वंचितच आहेत. पिढ्यान पिढ्या भटकंती करणार्या या लोकांना अद्याप स्थिरता लाभलेली नाही.

No comments:

Post a Comment