Saturday, September 8, 2018

सर्व वंचित शेतकऱ्यांना पीक विमा द्या-बसवराज पाटील

 (शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा,यासाठी बसवराज पाटील यांनी तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन दिले.)

जत,(प्रतिनिधी)-

उमदी, माडग्याळ, संख, दरिबडची, मुचंडी, उमराणी, बिळुर, बसर्गी, डफळापूर (ता.जत ) या सह अनेक गावांतील जिल्हा मध्यवर्ती बँकेत शेतकऱ्यांनी 2017 च्या खरीप हंगामातील पीक विम्याचा हप्ता भरूनही अनेक शेतकऱ्यास खरिप हंगामाचा पीक विमा मिळालेला नाही. तसेच तालुक्यातील इतर गावांना अर्धवट पीक विमा मिळाला आहे. त्यामुळे सर्व वंचित शेतकऱ्यांना चार दिवसांत पीक विमा वाटप करावा, या मागणीसाठी बसवसेना अध्यक्ष तथा अ.भा.सरपंच परिषदेचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी  तहसिलदार सचिन पाटील यांना निवेदन दिले आहे.  

सदर पीक विम्याबाबत बँकेत जाऊन काही शेतकऱ्यांनी चौकशी केली असता तुमच्या नावे रक्कमच आलेली नाही असे सांगितले जाते. तरी पीक विम्यापासून वंचित गावे तसेच अर्धवट पीक विमा मिळालेल्या गावातील राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन बसवसेना रस्त्यावर उतरेल असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी अजिंक्य राक्षे, रविंद्र शेगावे, हणमंत लंगुटे, सुनिल आरगोडी उपस्थित होते.

पुढील वर्षात ३३ कोटी वृक्षलागवड



जत,(प्रतिनिधी)-
राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचा प्रयोग यशस्वी केल्यानंतर आता पुढील वर्षात ३३ कोटी वृक्षलागवडीसाठी राज्य सरकारने पाऊल टाकले आहे. त्यासाठी नियोजन ठरविण्यात आले असून सर्व विभाग व यंत्रणांना वृक्षलागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहेत.

'हरित महाराष्ट्र' संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी आणि त्यातून दुष्काळ, पाणीटंचाई व अन्य नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी राज्यातील सध्याचे वनक्षेत्र २0 टक्क्याहून ३३ टक्क्यांपर्यंत नेण्याचा सरकारचा संकल्प आहे. त्यासाठी वृक्ष लागवडीचा महात्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून त्याला आता लोकचळवळीचे स्वरूप आले आहे.
यावर्षी १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत १३ कोटी वृक्ष लागवडीचा यशस्वी कार्यक्र म राबविण्यात आला. सर्व विभाग व यंत्रणा व सामाजिक संस्थांनी या उपक्र माला भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे आता पुढील वर्षात ३३ कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्र म राबविण्यात येणार आहे.
हा कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी राज्य सरकारने सर्व विभागांना ठराविक वृक्षलागवडीचे उद्दीष्ट दिले आहे. यामध्ये वनविभाग ७.२९ कोटी, सामाजिक वनीकरण ७.२९ कोटी, वनविकास महामंडळ ४.१७ कोटी, ग्रामपंचायत ८ कोटी व इतर यंत्रणा ६.२५ कोटी वृक्षलागवडीचा समावेश आहे. हा कार्यक्र म १ जुलै २0१९ ते ३0 सप्टेंबर २0१९ या कालावधीत सलग तीन महिने राबविला जाणार आहे.

जिवंत वृक्षांची होणार मोजणी
राज्य सरकारने २ कोटी, ४ कोटी, १३ कोटी असे वृक्षलागवडीचे कार्यक्र म राबविले आहेत. पुढील वर्षी ३३ कोटी वृक्षांची लागवड होणार आहे. विविध प्रशासकीय विभागांनी लावलेल्या किंवा यापुढे लावण्यात येणार्‍या वृक्षांचे संरक्षण, संगोपन व वृक्ष जिवंत राहण्याचे प्रमाण याची माहिती राज्य सरकारला द्यावी लागणार आहे. विभागीय आयुक्त हे अशी माहिती सर्व जिल्हाधिकार्‍यांकडून संकलित करतील. तसेच दरवर्षी ३१ ऑक्टोबर व ३१ मे रोजी वृक्षांची मोजणी करून जिवंत असलेल्या वृक्षांची माहिती सरकारला कळवावी लागणार आहे.

संविधान सन्मान मोर्चासाठी जत तालुक्यातून हजारोंच्या संख्येने लोक सांगलीला जाणार

संविधान सन्मान मोर्चासाठी जत तालुक्यातून हजारोंच्या संख्येने लोक सांगलीला  जाणार 

जत,(प्रतिनिधी)-
दि.10 सप्टेंबर 2018 रोजी सांगली येथे होणाऱ्या संविधान सन्मान मोर्चासाठी जत तालुक्यातून हजारोंच्या संख्येने संविधानप्रेमी उपस्थित राहणार आहेत,अशी माहिती प्रभाकर सनमडीकर यांनी दिली.

दिल्ली येथील जंतर मंतर वर काही  समाज कंटकांनी भारतीय संविधानाच्या प्रती जाळल्या व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणा दिल्या. जे संविधान भारतीयांची अस्मिता आहे.बहूजन समाजाच्या प्रगतीची       गुरुकिल्ली आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र बांधून ठेवणारी संजीवनी आहे. या संविधानाचा सन्मान सर्व भारतीयांनी केलाच पाहीजे. 
म्हणून या संविधान सन्मान मोर्चासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान केले. यावेळी बोलताना श्री.सनमडीकर म्हणाले, जत तालुक्यातील दहा हजारांहून अधिक लोक या सन्मान मोर्चाला उपस्थित राहणार आहेत. आमचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन समाजप्रबोधन करत आहेत. सर्वच पक्षाचे,धर्माचे लोक यात सामील होत आहेत. या मोर्चासाठी प्रतिसाद मोठा मिळत असून मोर्चा यशस्वी करण्यासाठी गावोगावचे कार्यकर्ते झटत आहेत. यावेळी अॅड. म्हाळाप्पा पुजारी, सामाजिक कार्यकर्ते  प्रभाकर सनमडीकर, विक्रम ढोणे, अविनाश वाघमारे, अजित पाटील, अशोक बन्नेनवर, टी एम वाघमोडे,सुनिल सुर्यवंशी, राजू ऐवळे,अनिल मिसाळ, संजय कांबळे, अतुल कांबळे, भूपेंद्र कांबळे, इब्राहिम नदाफ, पट्टू गवंडी,सलीम गवंडी, बंटी नदाफ,राजू इनामदार, अरूण साळे, दत्तात्रय शिंदे, किरण शिंदे, दिनकर पतंगे, तुकाराम माळी, शिवशरण, जकाप्पा सर्जे आदी उपस्थित होते.

जत तालुक्यातील शेतकर्‍यांना दमदार पावसाची प्रतीक्षा

जत तालुक्यातील  शेतकर्‍यांना दमदार पावसाची प्रतीक्षा

हवामान अंदाज चुकला; रब्बी पिकांवरही होणार परिणाम
जत,(प्रतिनिधी)-
भारत हा कृषी प्रधान देश आहे येथील अधिकतर नागरिकांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहेत. तसेच भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. मात्र, मागिल काही वर्षांपासून सुखा, ओला दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्ती आल्यावर शेतकर्‍यांची परीस्थिती फारच दयनिय स्वरुपाची होत आहे, अशीच परिस्थिती पुन्हा यावर्षी जत तालुक्यातील शेतकर्‍यांची झालेली आहे. 
पावसाळा सुरू होऊन तीन महिने लोटले. तरीही जत तालुक्यात एकही मुसळधार पाऊस न पडल्यामुळे येथील नदी, नाले, विहिरी, तलाव अजुनही कोरडेच असल्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहेत. यामुळे परिसरात दमदार पाऊस केव्हा पडणार? या प्रतिक्षेत शेतकरी चिंतातूर झाला आहे.
यावर्षी हवामान खात्याने दमदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, मागिल तीन महिण्यांपासून हवामान खात्याचा अंदाज चुकीचा ठरत आहे. जत तालुक्यात फक्त 190 मी. मी. पाऊस पडला असल्याची माहिती मिळाली असून, या तालुक्यात दमदार पाऊस न पडल्यामुळे व अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे शेतातील पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. यंदाचा खरिप पूर्णपणे वाया गेला आहे.

ग्रामीण भागात असलेल्या नागरिकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती असल्यामुळे यावर त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. यातही अनेक शेतकर्‍यांची शेती कोरडवाहू असल्यामुळे त्यांची शेती निसर्गाच्या पावसावरच अवलंबून असते. मात्र मागील तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍यांना तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे शेतकर्‍यांची परिस्थिती अतिशय हलाकीची होत चालली आहे. त्यामुळे तो कर्जाच्या बोजाखाली दबत चालला आहे. यामुळे शेती कशी करावी मुलाबाळांचे शिक्षण, लग्न व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, अशाप्रकारचे अनेक संकट शेतकर्‍यांसमोर उभे टाकले आहेत. समाधानकारक पाऊस न झाल्याने नदी, नाले, विहिरी व तलाव कोरड्या स्थितीत आहेत. यामुळे याचा परिणाम रब्बी हंगामातील पेरणीवर पडणार असल्याने खरिप पीक तर गेलेच शिवाय रब्ब्बी पिकाचीसुद्धा आशा नसल्याने परिसरात सर्वे करून शासनाने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.

गुणवंत शिक्षकांचा मागासवर्गीय शिक्षक संघटनेमार्फत सत्कार

( सनमडी (ता.जत) येथील केंद्रशाळेत आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा सत्कार मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्यावतीने करण्यात आला.)





















जत,(प्रतिनिधी)-
सनमडी ( ता.जत) येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत शिक्षक दिनानिमित्त सहारा ग्रुप संस्थेच्या वतीने पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना जत तालुका शाखेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी  साहित्यिक ,शिक्षक मच्छिंद्र ऐनापुरे (केंद्र-जिरग्याळ), सिद्धेश्वर कोरे(केंद्र-जाडरबोबलाद),प्रकाश माळी(केंद्र गुडडापूर),भाऊसाहेब महानूर (केंद्र-डफळापूर),प्रल्हाद हुवाळे( केंद्र-सनमडी) या पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा पुस्तके ,पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी गावचे सरपंच सौ.रुक्मिणी पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तमन्ना कर्ले,तंटामुक्ती अध्यक्ष महादेव सलगर, राष्ट्रपती पदकप्राप्त ऑर्डनरी कॅप्टन उमाजी महानोर जिल्हा उपाध्यक्ष मलेशपा कांबळे, तालुका अध्यक्ष-सुनील सूर्यवंशी,अनिल मिसाळ ,संतोष काटे इत्यादी उपस्थित होते.
यावेळी  शिक्षक दिलीप साळुंखे मान्यवरांचे स्वागत केले.संजय कोळी यांनी प्रास्ताविक केले .कार्यक्रमाचे नियोजन प्राणिशा गुरव यांनी केले.राकेश वसावे यांनी आभार मानले 

चांगली पिढी घडवण्याचे शिक्षकांपुढे आव्हान:स्वामी अमृतानंद महाराज

चांगली पिढी घडवण्याचे शिक्षकांपुढे आव्हान:स्वामी अमृतानंद महाराज

आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर

बिळूर:

आज मुलगा आई-वडिलांना विचारेना,व्यसनाधिनता, खून-हाणामार्‍या वाढल्या आहेत.सर्वत्र आराजकता माजली आहे. आजच्या मुलांवर संस्कार घडवण्याची गरज आहे.शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थी फक्त गुणांच्या मागे लागलेले आहेत. समाज,देश आदर्श बनवायचा असेल तर पहिल्यांदा चांगली पिढी घडविणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन बालगाव (ता. जत) येथील मठाचे स्वामी अमृतानंद महाराज यांनी बोर्गी (ता. जत) येथील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना केले.

बोर्गी येथील सहारा कला,क्रीडा,व्यायाम व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर आणि आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम नुकताच पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रवींद्र आरळी होते. यावेळी बोलताना अमृतानंद महाराज म्हणाले, सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला आशियाई स्पर्धेत फक्त 59 पदके मिळतात. मात्र इंडोनेशियासारखे छोटे देश शतकांवर पदके मिळवतात. आपल्याकडील शिक्षण पद्धती चुकीच्या मार्गाने चालली आहे.अभ्यास आणि गुण यांकडे आपण लक्ष देत आहोत. त्यामुळे खरे संस्कार बाजूला पड्त चालले आहेत. हे असेच चालू राहिले तर देशात आराजकता माजल्याशिवाय राहणार नाही.त्यामुळे संस्कारशील पिढी घडवण्याची गरज आहे. आणि शिक्षकांपुढे हे मोठे आव्हान आहे.

सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती तम्मणगौडा रवी-पाटील यांनी जत तालुक्यात शैक्षणिक गुणवत्ता चांगली असून ती आणखी उंचावण्यासाठी आपले सहकार्य राहील, असे सांगितले. डॉ. रवींद्र आरळी यांनी कोणतेही कार्यक्रम आता पेपरलेस आणि फॉवरलेस व्हायला हवेत. उपस्थितांना पुस्तक भेट देण्याचा उपक्रम राबवावा हे सांगतानाच त्यांनी सहारा ग्रुपने शिफारस केलेल्या रुग्णास मोफत उपचार केले जातील, असे सांगितले.

यावेळी संभाजी कोडग, रामराव मोहिते,मच्छिंद्र ऐनापुरे, सिद्धू कोरे,कुमार चौगुले, प्रल्हाद हुवाळे, भाऊसाहेब महानोर आदी 28 शिक्षकांना प्रमाणपत्र, पदकासह आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक सहारा ग्रुपचे सचिव आशिफइक्बाल जाहगिरदार यांनी केले. प्रा.घन:शाम चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. आभार राजेंद्र बिराजदार यांनी मानले. जी.के.बिराजदार, अ‍ॅड, आडव्याप्पा घेरडे, अशोक बरडोल, सचिन होर्तीकर, संजय तेली,तम्मणगौडा रवी-पाटील यांनी सहारा ग्रुपला आर्थिक मदत जाहीर केली. गटशिक्षणाधिकारी बी.एन. जगधने, विनायक शिंदे, चनबसू चौगुले,संभाजी कोडग यांनी आपले मनोगत व्यक्त केले.लखन होनमोरे, मलकारी होनमोरे,गांधी चौगुले,लकाप्पा शिरगट्टी, मंडळाचे अध्यक्ष दावल पुळुजकर, उपाध्यक्ष मौलाली सातभाई,खजिनदार मल्लिकार्जून उटगी यांनी कार्यक्रमाचे नेटके संयोजन केले.

 
फोटो ओळ(बोर्गी ता.जत येथील सहारा कला,क्रीडा,व्यायाम व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने जत तालुक्यातील 28 शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी स्वामी अमृतानंद महाराज,जि.प.शिक्षण सभापती तम्मणगौडा रवी-पाटील,डॉ.रवींद्र आरळी,गटशिक्षणाधिकारी बी.एन.जगधने आदी उपस्थित होते.)

आवंढीमध्ये दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार


आवंढीमध्ये दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील आवंढी गावातल्या महिला गावात दारूबंदी व्हावी,यासाठी पुढे सरसावल्या आहेत. 10 सप्टेंबरपूर्वी गावात दारूबंदी झाली नाही तर दारूबंदी व उत्पादन शुल्कच्या जत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा गावातल्या महिलांनी दिला आहे.
पानी फौंडेशनच्या कामात भरीव काम करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरदेखील प्रभाव टाकणार्या या गावातल्या महिला आता गावात दारूबंदी व्हावी,यासाठी पुढे सरसावल्या आहेत. दारूमुळे या गावातील अनेक कुटुंबे उदवस्त झाली आहेत. अनेक कुटुंबे उद्वस्त होण्याच्या वाटेवर आहेत. महिलांना काही भागातून एकट्याने जाणेसुद्धा अवघड होऊन बसले आहे, अशा परिस्थितीत संतापलेल्या महिलांनी गावात दारूबंदी व्हावी,यासाठी चंगच बांधला आहे. गावातील दारू अड्डे बंद व्हावेत,यासाठी काल गावातल्या महिलांनी थेट जतचे पोलिस ठाणे गाठले होते. या पोलिसांनी दारूबंदी व उत्पादन शुल्कच्या कार्यालयाकडे जाण्याचा सल्ला दिला. महिलांनी या कार्यालयाबाहेर गर्दी करून गावात दारूबंदी करण्याची मागणी केली.
दरम्यान, उत्पादन शुल्कचे अधिकारी एम.व्ही. शेंडे यांनी त्यांना आश्वासन दिले आहे. मात्र 10 सप्टेंबरपर्यंत गावात दारूबंदी झाली नाही तर कार्यालयापुढे उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. दारूबंदी समितीच्या अध्यक्षा संगीता दिलीप कोडग, उपाध्यक्षा रत्नमाला शामराव कोडग, सचिव प्रतिभा तानाजी कोडग, सहसचिव अर्चना सुधाकर कोडग, कांचन सुभाष कोडग या म्हणाल्या की, 24 ऑगस्टच्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव करण्यात आला आहे,परंतु आजपावेतो गावात दारूबंदी झाली नाही नाही. त्यामुळे आम्हाला आता रस्त्यावर उतरावे लागले आहे. आता गावात दारूबंदी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.