Monday, May 24, 2021

सांगलीचा एव्हरेस्ट वीर संभाजी गुरव


मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षक पडवळवाडी (ता. वाळवा) येथील संभाजी गुरव  यांनी जगातील सर्वांत उंच असलेले एव्हरेस्ट शिखर सर करून महाराष्ट्र पोलिस दलाचा झेंडा फडकावला. त्यांच्या या कामगिरीने वाळवा तालुक्‍याचे नाव गिर्यारोहकांच्या यादीत नोंदवले गेले आहे. गुरव यांनी एव्हरेस्ट शिखर सर केल्याची घोषणा संबंधित कंपनीने आपल्या वेबसाईटवर केली आहे.

गुरव मुंबई पोलिस दलात कार्यरत आहेत. एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या महाराष्ट्र पोलिस दलाचे ते तिसरे कर्मचारी ठरलेत. गुरव यांना पोलिस दलात भरती होण्यापूर्वी गिर्यारोहणाची आवड होती. ती त्यांनी पोलिस दलात भरती झाल्यानंतरही जोपासली. त्यांनी यापूर्वी आपली शारीरिक क्षमता तपासणीसाठी एव्हरेस्ट बेसकॅम्प प्रशिक्षण  पूर्ण केले होते. त्यानंतर एव्हरेस्ट सर करणारच, असे ध्येय उराशी बाळगून त्यांनी गेली दोन वर्षे अथक परिश्रम केले. एव्हरेस्ट शिखर सर केल्याने त्यांच्या परिश्रमाचे चीज झाले आहे. उणे १९ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असलेल्या एव्हरेस्ट शिखरावर त्यांनी काठमांडू  येथून चढाई करण्यास सुरुवात केली. एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ६५ किलोमीटरचा टप्पा त्यांनी पूर्ण करत १७ मे रोजी बेस कॅम्प २ पर्यंत, १८ मे रोजी बेसकॅम्प ३, १९ मे रोजी बेस कॅम्प ४ आणि २० मे रोजी तेथून एव्हरेस्ट शिखराची चढाई सुरू केली. २१ मेपर्यंत निसर्गाची साथ राहिली, तर एव्हरेस्ट सर करता येईल, अशी आशा होती. वातावरण आणि निसर्गाने साथ दिल्याने शनिवारी (ता. २२) रोजी त्यांनी एव्हरेस्ट शिखरावर आपले पाय रोवले. त्यांच्या या कामगिरीने वाळवा तालुक्‍यासह सांगली जिल्ह्याचे नाव गिर्यारोहकांच्या यादीत सुवर्ण अक्षरांनी नोंदवले गेले आहेच. त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

स्वप्न पूर्ण झाले संभाजी गुरव हे वाळवा गावाशेजारील पडवळवाडीचे रहिवासी आहेत. ते सामान्य कुटुंबात जन्मले. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ते पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षकपदी भरती झाले. त्यांनी यापूर्वी गडचिरोली येथे पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. व्यायाम आणि शारीरिक क्षमता राखण्यावर त्यांचा कायम भर असे. एक दिवस जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर करायचे हे त्यांचे स्वप्न होते. ते अनेक वेळा बोलूनही दाखवत. ते कायम व्यायाम व त्यासाठी लागणारी शारीरिक क्षमता निर्माण करण्यासाठी धडपडत होते. ८८४८ मीटर उंच एव्हरेस्टवर चढाई करताना त्यांना अनंत अडचणी व बर्फवृष्टीचा सामना करावा लागला; पण त्यांनी एव्हरेस्ट शिखर सर करून एव्हरेस्टवीर हा मानाचा किताब पटकावला.

तिसरे पोलिस कर्मचारीयापूर्वी महाराष्ट्र पोलिस दलातील आयपीएस सुहेल शर्मा, औरंगाबाद येथील पोलिस कर्मचारी रफीक शेख यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. त्यांच्यानंतर संभाजी गुरव हे शिखर सर करणारे तिसरे कर्मचारी ठरले आहेत. दरम्यान सांगली शेजारील कोल्हापूर जिल्ह्यातील कस्तुरी याही आता एव्हरेस्ट शिखराजवळ पोहोचल्याची बातमी आली आहे. कॅम्पच्या तीनच्या दिशेने चढाई करत आहेत. करवीरकन्या कस्तुरी सावेकरची एव्हरेस्टची अंतिम चढाई सुरू झाली असून बुधवारी (२६) पहाटे ती एव्हरेस्टवर तिरंगा फडकवण्याची शक्यता आहे. एकूणच कोल्हापूरसाठी ही अभिमानाची गोष्ट असून, आज ती कॅम्प दोनवर होती. उद्या (सोमवारी) पहाटे ती कॅम्प तीनच्या दिशेने चढाईला प्रारंभ करणार आहे.

कस्तुरीच्या टीममध्ये एकूण बारा गिर्यारोहकांचा समावेश आहे. ही सर्व टीम सुखरूप असून मंगळवारी (२५) पहाटे कॅम्प चारच्या दिशेने त्यांची चढाई सुरू होईल आणि बुधवारी पहाटे एव्हरेस्टचा शिखर माथा ती गाठेल आणि एव्हरेस्टवर कोल्हापूरचा झेंडा रोवेल, असे आज तिचे वडील दीपक सावेकर यांनी सांगितले. दरम्यान, कस्तुरी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून इतक्या मोठ्या मोहिमेसाठी गेली असून, तिला अनेक सेवाभावी व्यक्ती, संस्था, संघटनांनी आर्थिक बळ दिले आहे. मात्र, तरीही निधी कमी पडला असल्याने मालोजीराजे छत्रपती यांनी तत्काळ पन्नास हजारांची आर्थिक मदत कस्तुरीचे वडील दीपक सावेकर यांच्याकडे दिली. यावेळी मधुरिमाराजे छत्रपती, उद्योजक तेज घाटगे, जय कामत, यशराजराजे छत्रपती आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment