Sunday, November 29, 2020

कवठेमहांकाळला महामार्ग पोलीस मदत केंद्र


सांगली,(जत न्यूज वृत्तसेवा)-

महामार्गावर अपघात अधिक प्रमाणात होतात. शिवाय अपघातात अडकलेल्या लोकांना किंवा अडचणीत सापडलेल्या वाहन चालकांना वेळेत मदत मिळत नाही. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. यासाठी महामार्ग पोलीस मदत केंद्राचा उपयोग होऊ शकतो. याठिकाणी सतर्क यंत्रणा आणि पुरेसा कर्मचारी महत्त्वाचा आहे. या महामार्ग पोलीस मदत केंद्रामुळे महामार्गावरील अपघाताची माहिती पोलीस ठाण्याला देता येते आणि अडचणीत सापडलेल्या वाहनचालकांना मदत करता येते. वाहतूक सुरळीत राहील यासाठी दक्षता घेता येते. महामार्गावरील लूटमारी व इतर गुन्ह्यांना प्रतिबंध करता येते. आणि महत्त्वाचं म्हणजे वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी उपाययोजना करता येते. सध्या राज्यात विविध राष्ट्रीय महामार्गावर आणि राज्य मार्गावर 63 पोलीस मदत केंद्रे होती. आता त्यात आणखी 13 मदत केंद्रांची भर पडली आहे. यात सांगली जिल्ह्यात कवठेमहांकाळ पोलीस केंद्राचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात रत्नागिरी-नागपूर आणि गुहागर-विजापूर हे दोन राष्ट्रीय म महामार्ग जातात. तसेच मिरज-पंढरपूर या राज्यमार्गही जातो.या महामार्गावर अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे.  त्यामुळे घटना घडल्यावर पोलिसांची मोठी धावपळ होते. त्यामुळे या ठिकाणी मदत केंद्राचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी पाठवण्यात आला होता. तो आता मंजूर झाला आहे, मात्र इस्लामपूरजवळील पेठनाका येथील प्रस्ताव प्रलंबित राहिला आहे. सांगली जिल्ह्यात कोल्हापूर मार्गावर देखील मदत केंद्राची आवश्यकता आहे. कवठेमहांकाळ महामार्ग पोलीस मदत केंद्रासाठी 34 पदे मंजूर करण्यात आली आहेत. यात पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक फौजदार, पोलीस हवालदार 8, पोलीस शिपाई21 आणि चालक 3 यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment