Thursday, August 24, 2023

जादूटोणाविरोधी विधेयक’ मंजूर करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

सांगली,(प्रतिनिधी):

 नरबळी, भूत उतरवणे, पैशांचा पाऊस, गुप्तधन, नग्नपूजा अशाप्रकारची बुवाबाजी करणाऱ्यांविरोधात राज्यात जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गेल्या दहा वर्षांत हजारांपेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. यामधील दहा गुन्ह्यांत भोंदूबाबांना शिक्षा झाली आहे.

अनेक खटले न्यायालयात सुरू आहेत. विशेष म्हणजे तक्रारदारांमध्ये लैंगिक शोषण झालेल्या महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. 

या कायद्याबाबत शासनपातळीवरून पुरेशा प्रमाणात जनजागृतीची जरुरी आहे.‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर २६ ऑगस्ट २०१३ रोजी तत्कालीन राज्य सरकारने ‘जादूटोणाविरोधी विधेयक’ मंजूर केले. अशाप्रकारे कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य बनले असून त्यानंतर कर्नाटकमध्ये हा कायदा झाला.या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘अंनिस’ विविधस्तरांवर प्रयत्न करीत आहे. नरबळी देणे अथवा देण्याचा प्रयत्न करणे, करणी, भानामती, जादूटोणा, भूत उतरविण्याच्या बहाण्याने अंगाला चटका देणे, जबरदस्तीने मानवी विष्ठा तोंडात कोंबणे, मारहाण करणे, चमत्काराचा दावा करून महिलांचे लैंगिक शोषण करणे, गुप्तधन काढण्याच्या बहाण्याने अघोरी प्रथांचा अवलंब करणे, दैवी शक्तीचा दावा करून महिलांना विवस्त्र पूजेस बसण्यास जबरदस्ती करणे, डाकीण समजून त्रास देणे, पैशांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने फसवणूक करणे आदी घटनांमध्ये जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले आहेत.

गेल्या दहा वर्षांत एक हजारांवर भोंदूबाबा बुवांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये सर्व धर्मातील भोंदूबाबांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे. जादूटोणाविरोधी कायदा देशपातळीवर लागू करा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.‘कायद्याचे नियम करा’महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर सरकारने जादूटोणाविरोधी कायदा महाराष्ट्रात लागू केला, तरी या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोणत्याही सरकारला नियम करण्यासाठी वेळ मिळाला नाही. जादूटोणाविरोधी कायद्याचे नियम तातडीने तयार करावेत, अशी मागणीही डॉ. दाभोलकर यांनी केली.

म्हैसाळ येथील नऊ जणांचे हत्याकांड, सातारा येथील गुप्तधनाच्या लालसेमधून देण्यात आलेला नरबळी, पुण्यात गुप्तधनासाठी बळी देण्याचा झालेला प्रयत्न, नागपूरमधील पाच वर्षांच्या बालकाचा भुताने झपाटले म्हणून नातेवाइकांच्या मारहाणीत झालेला मृत्यू, पुण्यात उद्योजकाने व्यवसायात यश आणि पुत्रप्राप्तीसाठी सर्वांसमक्ष पत्नीला स्नान घातले होते.वर्ध्यात युवतीला विवस्त्र करून पैशाचा पाऊस पाडण्याचा प्रकार घडला होता, बीडमध्ये म्हशीवर करणी केल्याच्या संशयावरून चिमुकल्याचा बळी देण्यात आला होता, पंढरपूरला लोमटे महाराजाकडून महिलांवर अत्याचार करण्यात आला होता.मुंबईत वकील महिलेवर पतीसमोरच मांत्रिकाने केलेला बलात्कार, पुण्यात संगणक अभियंता महिलेला मूल होण्यासाठी स्मशानातील राख आणि हाडांची भुकटी खाण्याची बळजबरी आदी माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना उघड झाल्या आहेत.

No comments:

Post a Comment