Wednesday, July 26, 2023

चारा निर्मितीसाठी सांगली जिल्ह्यात अभियान

प्रति शेतकरी पाच किलो मका बियाणे देणार: जिल्ह्यातील पशुधनासाठी शासनाचा उपक्रम

सांगली,(प्रतिनिधी):

जिल्ह्यातील पशुधनासाठी शासनाने चारा निर्मिती अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात एक ऑगस्ट पासून याची अंमलबजावणी होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाच किलो मका बियाणे पन्नास टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजनकडून निधीची उपलब्धता केली जाणार आहे. सुमारे एक कोटी निधीतून पन्नास हजार शेतकऱयांना याचा लाभ देण्यात येणार आहे. अधिवेशनामध्ये याबाबतचा निर्णय झाला असून राज्यासह जिल्ह्यात ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबविण्याच्या सुचना जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाला देण्यात आल्या आहेत. 

राज्यात जिल्ह्यासह यंदाचा मान्सून वेळेवर दाखल झाला नाही. परिणामी जिल्ह्यात चारा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून लोकांची धावाधाव सुरू झाली आहे. जुलै मध्यानंतर पावसाने सुरुवात केली आहे. मात्र सद्यस्थितीत चाऱ्याचा प्रश्न गंभीरच आहे. चाऱ्यासाठी उसाची तोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एका बाजूला पावसाअभावी उसाची वाढ खुंटली आहे. तर दुसऱ्या बाजूला चाऱ्या साठी तोड सुरू झाल्याने कारखानदार हवालदिल झाले आहेत. चाऱ्या साठी उसाची अशीच तोड सुरू राहिल्यास हंगामावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निर्माण झालेल्या परिस्थितीवर हिवाळी अधिवेशनात चर्चा झाली. चारा छावण्या सुरू करण्यावरही चर्चा झाली. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून चारा टंचाईबाबतची माहिती मागवण्यात आली आहे. असे असले तरी तात्काळ मार्ग चारा निर्मिती अभियानाच्या माध्यमातून उपासमार सुरू असलेल्या पशुधन वाचवण्याचा निर्णय घेण्यात आला. या अभियान अंतर्गत कमी कालावधीत चारा निर्मिती होणारे मका बियाणे शेतकऱ्यांना देऊन चारा निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजनमधून उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

या अभियानातून जिल्ह्यातील प्रति शेतकरी किमान पाच ते दहा किलो मका बियाणांचे वाटप केले जाणार आहे. सुमारे एक कोटी निधीतून ही योजना राबविण्यात येणार आहे. किमान पन्नास हजार शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप करण्यात येणार आहे. दोन ते तीन लाख जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटणार असल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाने केला आहे. 

तालुका निहाय जनावरांची संख्या (अनुक्रमे तालुका, गाय, म्हैस) शिराळा- 13 हजार 316, 2309 वाळवा- 27 हजार 134, 4 हजार 990 पलूस- 10 हजार 199, 15 हजार 339 कडेगाव- 7 हजार 400, 16 हजार 288 खानापूर- 7 हजार 667, 15 हजार 499, आटपाडी- 11 हजार 12, 11 हजार 589 तासगाव- 15 हजार 750, 19 हजार 272 मिरज- 19 हजार 659, 33 हजार 858 कवठेमहांकाळ- 14 हजार 675, 16 हजार 855 जत- 31 हजार 266, 29 हजार 029 एकूण- 1 लाख 58 हजार 78, 1 लाख 65 हजार 90 

No comments:

Post a Comment