Friday, August 27, 2021

कप-बशी


बशी म्हणाली कपाला," श्रेय नाही नशिबाला पिताना पितात बशीभर अन् म्हणताना म्हणतात कपभर!"

कप म्हणाला बशीला,"तुझा मोठा वशिला धरतात मला कानाला अन् लावतात तुला ओठाला!"

स्त्री आणि पुरुष यांचे प्रतीक असलेली कप बशी. स्त्री आणि पुरुष कप-बशीप्रमाणे एकरूप, परस्पर पूरक आहेत. त्यांना एकटे अस्तित्व नाही. दोघे जोडीनेच वावरतात. बशी ही स्त्रीचे तर कप हे पुरुषाचे प्रतीक आहे. कपभर चहाने घटकाभर उत्साह वाटला तरी बशीभर चहाने अंतरात्मा शांत राहतो. कपाप्रमाणे पुरूष कणखर, तर स्त्री बशीप्रमाणे विनम्र असते. कप पोरकट असतो, म्हणून त्याचा कान धरावा लागतो. पण, कपातून सांडले तर बशी सांभाळून घेते. एकमेकांना सांभाळण्यास पूरक जन्मभर टिकणारी अन्यथा फुटण्याला निमित्त शोधणारी अशी ही जोडी कप-बशी!

*******************************

आजींनी हॉस्पिटलमध्ये फोन केला आणि म्हणाल्या:

मला रूम नंबर ३०२ मधल्या निर्मला यांची तब्येत कशी आहे ते कळू शकेल का जरा. काळजी वाटतीये म्हणून फोन केला..

जरा दोन मिनिटं होल्ड करा हं' असं म्हणत तिथल्या

ऑपरेटरनी तिसऱ्या मजल्यावरच्या नर्सशी फोन जोडून दिला. नर्स म्हणाली - बऱ्या आहेत त्या आता. बीपी पण नॉर्मल झालंय आणि सगळ्या टेस्ट्स पण नॉर्मल आल्यात. डॉक्टर म्हणतायत उद्या सोडतील घरी त्यांना.

वा... वा! खूप बरं वाटलं ऐकून! धन्यवाद! - आजी म्हणाल्या.

नर्स : तुम्ही त्यांची बहीण बोलताय का?

नाही, मी स्वतः निर्मला बोलतीये ३०२ मधून ! मला कोणीच काही धड सांगेना, म्हणून म्हंटलं स्वतःच चौकशी करावी!


Wednesday, August 25, 2021

व्याख्या ज्या हसवतील

 


पेन : दुसऱ्याकडून घेऊन परत न करण्याची वस्तू.

बाग : भेळ शेवपुरी वगैरे खाऊन कचरा टाकण्याची जागा.

चौकशीची खिडकी : इथला माणूस कुठे भेटेल हो ?अशी चौकशी बाजूच्या खिडकीत करावी लागणारी एक जागा.

ग्रंथपाल : वाचकाने मागितलेले पुस्तक बाहेर गेले आहे असे तंबाखू चघळत तिरकसपणे सांगण्यासाठी नेमलेला माणूस.

विद्यार्थी : आपल्या शिक्षकांना काहीही ज्ञान नाही असे मानून आत्मकेंद्रित राहणारा एक जीव,

कार्यालय : घरगुती ताण-तणावानंतर विश्रांती मिळण्याची हक्काची जागा.

जांभई : विवाहित पुरुषांना तोंड उघडण्याची एकमेव संधी.

कपबशी : नवरा बायकोच्या भांडणात बळी जाणारी वस्तू.

कॉलेज : शाळा व लग्न या मधील वेळ घालवण्याचे मुलामुलींचे ठिकाण.

चंद्र : कवीच्या हातात सापडलेला दुर्दैवी ग्रह

अनुभव : सभ्य शब्दात मांडलेल्या चुका

मोह : जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो

शेजारी : तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची

खडानखडा माहिती असते तो.

सुखवस्तू : वस्तुस्थितीत सुख मानणारा.

वक्तृत्व : मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे.

लेखक : चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा.

फॅशन : शिंप्याच्या हातून झालेल्या चुका.

पासबुक : जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव.

गॅलरी : मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा.

लेखणी : एकाच वेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचे साधन.

छत्री : एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ.

परीक्षा : ज्ञान तपासून घेण्याचे एक 'हातयंत्र'.

परीक्षा : पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ.

विश्वशांती : दोन महायुद्धांच्या मधला काळ,

दाढी : आळशीपणा व 'कुरुपपणा' लपवण्याचे' रुबाबदार' साधन.

थाप : आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात.

काटकसर : कंजूषपणाचे एक 'गोंडस' नाव.

नृत्य : पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला.

घोरणे : नवऱ्याने-बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी.

मन : नेहमी चोरीस जाणारी वस्तू,

ब्रह्मचर्य : कुठेच न जुळल्याने स्वीकारायचा मार्ग.

विवाहित माणूस : जन्मठेपेचा कैदी.

विधुर : जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी.

श्रीमंत नवरा : चालतं बोलतं एटीएम कार्ड,

श्रीमंत बायको : अचानक लागलेली लॉटरी.

*******


Tuesday, August 24, 2021

शेगाव येथे रविवारी 29 रोजी ग्रामीण साहित्य संमेलन

 जत,(जत न्यूज नेटवर्क)-

मराठी साहित्य सेवा मंच,डॉ. बलभीम मुळे स्मृती फाउंडेशन व ओम साई प्रतिष्ठान, शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शेगाव येथील चिंच विसावा येथे 24 वे ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती साहित्य सेवा मंचचे अध्यक्ष किरण जाधव, मच्छिंद्र ऐनापुरे व लवकुमार मुळे यांनी दिली.

या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संपतराव जाधव असणार आहेत. यावेळी पहिल्या सत्रात  दुपारी2 ते 3 या वेळेत कवी लवकुमार मुळे यांच्या 'कवीने पिंजून घ्यावा भोवताल' व कवी महादेव बुरुटे यांच्या 'पिंपळवन डॉट कॉम' या पुस्तकांचे प्रकाशन व अध्यक्षीय भाषण  होणार आहे.

नंतर  'नव्या पिढीला वाचनसंस्कृतीकडे कसे आणता येईल?' या विषयावर परिसंवाद होणार आहे.  यात पत्रकार शिवराज काटकर , दिगंबर शिंदे, नामदेव भोसले सहभागी असणार आहेत.

तिसऱ्या सत्रात श्रावणसर कविसंमेलन होणार आहे. इंद्रजीत घुले (मंगळवेढा) हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. संतोष जगताप,  (लोणविरे),ज्योतिराम फडतरे, (वाटंबरे),रवी सांगोलकर,रशीद मुलाणी, रावसाहेब यादव,दिनराज वाघमारे,केशव सुर्वे,माणिक कोडग आदी कवींचा सहभाग होणार आहे. संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी विजय नाईक, मोहन मानेपाटील, कुमार इंगळे,समाधान माने,प्रल्हाद बोराडे उपस्थित होते.

Monday, August 23, 2021

खळखळत जगा.. नितळ झऱ्यासारखं शुद्ध..!!


शांत डोहावर कधी विश्वास ठेवू नये.. खोल बरंच काही कुजलेलं मिळतं. उथळ वाहणारं नितळ पाणीच उत्तम, पिण्यायोग्य असतं. माणूसही तसाच असावा! त्याच्या स्वभावात खळखळाटच असावा असं नाही, पण कमालीचा शांतपणा मात्र मुळीच नसावा, कधी कधी या सायलेंटखाली  त्याचं दबलेलं पूर्वआयुष्य मिळेल. उलट कधी पूर्णत: घमेंड, कुजकेपण याचा दर्प खोल आत दिसेल. सतत वाहत रहावं नितळ झऱ्यासारखं, लोकं म्हणू देत उथळ पाण्याला खळखळाट फार... तो खळखळाटच पाणी शुद्ध ठेवतो. डोह कधी कधी तळाशी घमेंड, कुजकेपणा या असल्या पदार्थांनी कुजका निघू शकतो. बेफिकीरपणे मांडावं, आपण आहोत तसे. लोकं मग ठरवतील तुमचा बरे वाईटपणा... स्वच्छंदीपणा हवा जगण्यात वागण्यात फक्त नैतिकतेचा लगाम हवा त्याला.. बाकी उधळा जगणं मुक्त हस्ताने... आयुष्य फार सुंदर आहे, ते असं कुजकेपणाणे कुणी वाया घालू नये बिनधास्त तारीफ करा, एखाद्या सुंदरतेची एखाद्या फुलाची, वेलाची, निसर्गाची आणि सुंदर एखाद्या मुलीचीही बरं का.. तिला तिची सुंदरता कळू द्या.. आवडली तर आवडली म्हणा, बिनधास्त... सगळे विकार अपेक्षा बाजूला ठेवुन मात्र..!

कुद्न मुळीच जगू नका, आयुष्य विश्वाचा वेळ पाहता फक्त तसूभर आहे... दिलखुलास जगा. सगळं उपभोगलं पाहीजे. थरार, आनंद, सुंदरता, आव्हानांना सामोरं जाण्यात आणि त्यानंतरच्या जिंकलेपणात जो आनंद असतो तोसुद्धा वेचता आला पाहीजे. डब्यासारखं एकाच ठिकाणी बसून जमत नाही. चारीआर मनाला घुमवलं पाहीजे. वैराग्याची भगवी वस्त्रे कधीच परिधान करु नका. कारण ती घातल्याने आतल्या चेतना मरत नाहित. सर्व आसक्ती जीवंत असू द्या, त्या जिवंत असणं हे आपण जिवंत असण्याचं लक्षण आहे. त्यांना फक्त सुंदरतेची झालर असू द्या, मग त्यांचं उपभोगणंही सुंदर होऊन जाईल. जगणही सुंदर होवून जाईल! खळखळत जगा.. नितळ झऱ्यासारखं शुद्ध..!!

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

'स्त्री'

एका संध्याकाळी सूर्य बुडत असतांना तिला तिच्या नातीने विचारले,"आज्जी, स्त्री म्हणजे काय असते गं ?"

सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्याने, मोतीबिंदू झालेल्या डोळ्याने ती झट्कन बोलली, 

"स्री सुद्धा मनुष्य असते. तिला तिचे आयुष्य असते

तुडवली तर नागीण असते.

डिवचली तर वाघीण असते.

कडाडली तर वीज असते.

तान्ह्या बाळाची नीज असते.

आणि बरं का पोरी, तिच्याच गर्भात भविष्याचे बीज असते!"

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

पेशंट : डॉक्टर, मला नवीन त्रास सुरू झालाय.

मी दुसरं वाक्य बोललो की, पहिलं वाक्य विसरुन जातो.

डॉक्टर : हा त्रास तुम्हाला कधीपासून आहे ?

पेशंट : कसला त्रास ?


Monday, August 16, 2021

कवी लवकुमार मुळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्य सेवा मंचच्यावतीने सत्कार


जत,(जत न्यूज)-

जत तालुक्यातील शेगाव येथील कवी लवकुमार मुळे यांच्या कवितासंग्रहांना पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्य सेवा मंच,जतच्यावतीने चिंच विसावा येथे सत्कार करण्यात आला. मुळे यांच्या 'कोणत्याही शक्यतेच्या पलीकडे' व 'कवीने पिंजून घ्यावा भोवताल' या कवितासंग्रहांना शब्दांगन संस्था, चंद्रपूरचे यांचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार  मिळाला आहे. साहित्य सेवा मंचचे अध्यक्ष व पत्रकार किरण जाधव, साहित्यिक मच्छिंद्र ऐनापुरे, प्रा, कुमार इंगळे, 'चिंच विसावा'चे व्यवस्थापक  प्रल्हाद बोराडे, सौ,बोराडे. अनिकेत ऐनापुरे आदी उपस्थित होते.

लवकुमार मुळे शेगाव यांचे आतापर्यंत 'गुलमोहर' , 'भावमुद्रा', 'काळीजवेणा', 'अर्ध वेलांटी', 'कोणत्याही शक्यतेच्या पलीकडे', 'कवीने पिंजून घ्यावा भोवताल' आदी कवितासंग्रह प्रकाशित आहेत. 'कोलाहल' व 'आत्म संवादाचे पांढर पक्षी' हे संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्यांच्या कवितासंग्रहांना शब्दांगण पुरस्कार( मिरज), दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूरचा विशेष पुरस्कार ,कै सुरेश कुलकर्णी पुरस्कार, औदुंबर सहित्याज्योती पुरस्कार (बीड), श्रीमती शहाबाई यादव साहित्य पुरस्कार (रेनावी), बेळगावचा वाङ्मय चर्चा मंडळाचा कृ. ब. निकुंभ साहित्य पुरस्कार मिळाले आहेत तर साहित्य प्रतिष्ठान, पुणेचा प्रतिभा गौरव पुरस्कार नुकताच घोषित झाला आहे.

प्रा.निर्मला मोरे यांना पी.एचडी. मिळाल्याबद्दल सत्कार


(प्रा.निर्मला मोरे यांचा सत्कार करताना मच्छिंद्र ऐनापुरे, अरुण शिंदे आणि प्रा.कुमार इंगळे.)

जत,(जत न्यूज)-

जत येथील राजे रामराव महाविद्यालयातील प्रा.निर्मला वसंत मोरे यांना पी. एचडी. मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी साहित्यिक मच्छिंद्र ऐनापुरे, मराठा सेवा संघाचे अरुण शिंदे व प्रा.कुमार इंगळे उपस्थित होते.

प्रा.निर्मला मोरे यांना शिवाजी विद्यापीठाची 'समकालीन मराठी ग्रामीण कथेतील स्त्री जीवन' या विषयावर पी. एचडी. मिळाली आहे. याबद्दल साहित्य सेवा मंचच्यावतीने साहित्यिक मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या हस्ते पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. प्रा.निर्मला मोरे या नववी पास होत्या. लग्नानंतर शिक्षण घेऊन त्या प्राध्यापक झाल्या.त्यांनी ग्रामीण स्त्री जीवन जवळून पाहिले असून साहित्यातील स्त्री जीवनाचा अभ्यास केला आहे.