Friday, December 4, 2020

भांगेला औषध म्हणून संयुक्त राष्ट्राची मान्यता


हजारो वर्षांपासून भांगेचा वापर हा मादक पदार्थ आणि औषध म्हणून करण्यात येतो. फक्त भारतीय उपखंडच नव्हे तर जगभरात भांगेचा असा वापर करण्यात येतो. आता संयुक्त राष्ट्र संघाने भांगेचा वापर औषध म्हणून करण्यास मान्यता दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसीनंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या अंमली पदार्थ आयोगाने भांगेला अंमली पदार्थाच्या यादीतून वगळले आहे.

संयुक्त राष्ट्र संघाने औषध म्हणून मान्यता दिली असली तरी वैद्यकीय कारण वगळून इतर कारणांसाठी त्याचा वापर करण्यास बंदी आहे. संयुक्त राष्ट्राच्या अंमली पदार्थाच्या यादीतून भांगेला वगळण्याबाबत मतदान झाले. यावेळी २७ सदस्य देशांनी प्रस्तावाच्या बाजूने आणि २५ सदस्यांनी प्रस्तावाविरोधात मतदान केले. या ऐतिहासिक मतदानात अमेरिका आणि ब्रिटनने यादीतील बदलाच्या बाजूने मतदान केले. तर, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नायजेरिया, रशिया आदी देशांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. संयुक्त राष्ट्राच्या मान्यतेनंतर भांगेपासून तयार करण्यात आलेल्या औषधांची मागणी असणार्‍या देशांचा फायदा होणार आहे. त्याशिवाय भांगेच्या औषधी गुणधर्माबाबत अधिक संशोधन होण्याची शक्यता आहे.

भारतात हजारो वर्षांपासून भांगेचा वापर करण्यात येतो. धार्मिक कर्मकांडातही त्याचा वापर करण्यात येतो. चीन आणि इजिप्तमध्येही भांगेचा वापर हजारो वर्षांपासून औषध म्हणूनच करण्यात येतो. संयुक्त राष्ट्र संघाने मान्यता दिल्यामुळे आता अनेक देशांना भांगेचा वापर औषध म्हणून करता येणार आहे. जगभरातील ५0 हून अधिक देशांमध्ये भांगेचा वापर करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. कॅनडा, उरुग्वे आणि अमेरिकेतील १५ राज्यांमध्ये भांगेचा औषधी वापर करण्यास परवानगी आहे.

संयुक्त राष्ट्र संघाकडून भांगेला मान्यता मिळणे ही मोठी बाब असल्याचे एका स्वयंसेवी संस्थेने म्हटले आहे. भांगेचा वापर अनेकजण औषध म्हणून करतात. भांगेपासून तयार करण्यात आलेल्या औषधांची विक्रीही वाढली आहे. औषध म्हणून भांगेला मान्यता देण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. भांगेवर बंदी घालण्याचा निर्णय हा वसाहतवादी विचारांचा परिणाम असल्याचे एनजीओने म्हटले आहे. भांगेवर बंदी असल्यामुळे जगभरातील अनेकजणांना दोषी असल्याचे समजण्यात येत होते.

Wednesday, December 2, 2020

फ्लॉवरचे औषधी गुणधर्म


आपल्या रोजच्या आहारात विविध भाज्यांचा समावेश असतो. शिवाय ऋतूमानानुसार विशिष्ट भाज्या उपलब्ध असतात. मात्र, त्यांचं आरोग्यदृष्ट्या महत्त्व लक्षात घ्यायला हवं. त्यादृष्टीने आज फ्लॉवरचे गुणधर्म जाणून घेऊ. फ्लॉवर चविष्ट आहे शिवाय अनेक उपयुक्त गुणधर्मांनी युक्त आहे. आदिवासी जमातींच्या आहारातही या भाजीला महत्त्व दिलेलं दिसतं. फ्लॉवरमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिनं, कबरेदकं, लोह, अ, ब, क ही जीवनसत्त्वं, आयोडिन, पोटॅशियम आणि काही प्रमाणात तांबं असे पोषक घटक असतात. त्याचं सेवन गुणकारी ठरतं. हिरड्यांमधून रक्त येत असेल तर फ्लॉवरच्या पानांचा रस प्रभावी ठरतो. कच्चा फ्लॉवर खाल्ला तर हिरड्यांवरची सूज कमी होते. दररोज रिकाम्या पोटी फ्लॉवरचा रस प्यायला तर कोलायटीस आणि पोटाचे इतर विकार दूर होतात. गळ्याला सूज आली असेल तर फ्लॉवरच्या पानांचा रस गुणकारी ठरतो. गळ्याच्या इतर विकारांवरही हा रस प्रभावी आहे. कच्चा फ्लॉवर स्वच्छ धुवून चावून खावा. यामुळे रक्त शुद्ध होतं आणि त्वचाविकार दूर होतात. भरपूर प्रमाणात लोह, प्रथिनं असल्याने शरीराला भरपूर उर्जा मिळते. रात्री झोपण्यापूर्वी फ्लॉवरचा रस प्यायल्यास बद्धकोष्ठतेच्या तक्रारी दूर होतात आणि पोट साफ होऊन जाते.

एड्सला ४0 वर्षे लोटले तरी अद्याप लस नाही


सांगली,(जत न्यूज वृत्तसेवा)-

एड्स या रोगाला ४0 वर्षे लोटल्यांतरही अद्याप लस मिळालेली नाही. कोणत्याही महामारीवर रामबाण औषध तयार करणे एवढे सोपे नसते, हा दावा वैज्ञानिकांनी आधीच केला आहे. यासाठी काही वर्षे लागू शकतात किंवा कधीच औषध सापडत नाही. असाच काहीचा प्रकार एड्सबाबत झाला आहे.
एड्सबाबत ३ डिसेंबर १९८0 रोजी वैज्ञानिकांना पहिल्यांदा समजले होते. एचआयव्ही संक्रमण रोखण्यासाठी किंवा हा रोग झालेल्या रुग्णाला बरे करण्यासाठी आजपर्यंत एकही औषध तयार झालेले नाही. हा आजार कोरोनाप्रमाणे एवढा खतरनाक नसला तरी लैंगिक संबंधांमुळे होत असल्याने तेवढाच बदनाम आहे. एड्स झालेल्याची सुई किंवा तत्सम टोचलेली वस्तू जर अन्य कोणाला लागल्यास त्यालाही एड्स होण्यीच शक्यता असते. शिवाय शारीरिक संबंध ठेवल्यावरही एड्स पसरण्याची शक्यता असते. एवढा मोठा रोग असूनही यावर जगभरातील रथी महारथी संशोधकांना यावर लस शोधता आली नाही.
एवढे असले तरीही एड्सबाबत जनजागृती आणि काळजी घेतल्याने हा रोग कमालीचा नियंत्रणात आला आहे.
एड्सबाबत ५ डिसेंबर १९८४ रोजी पहिल्यांदा माहिती मिळाली होती. यावर दोन वर्षांच्या आत एड्सवर औषध बनविण्यात येईल, असा दावा अमेरिकेच्या आरोग्य आणि मानवी सेवा विभागाने छातीठोकपणे केला होता. मात्र, जंग जंग पछाडूनही शास्त्रज्ञांना काही औषध सापडले नव्हते. मानवी शरीरात रोगांशी लढणारी प्रतिकारशक्ती एड्स व्हायरसच्या विरोधात कामच करत नाही. हा रोग ज्याला होतो, त्याच्या शरीरात अँटीबॉडी तयार होते. मात्र ती केवळ या व्हायरसच्या शरीरातील प्रसाराचा वेग कमी करते, रोखत नाही. यामुळे एचआयव्ही झालेल्या रुग्णाला बरे करणे जवळपास अशक्य आहे.
एड्स हा कोरोना एवढा वेगवान रोग नाही. त्याची शरीरामध्ये पसरण्याचा वेग हा काही वर्षांचा असतो. या काळात हा व्हायरस मानसाच्या डीएनएमध्ये लपून राहतो. यामुळे या व्हायरसला शोधून नष्ट करणे खूप कठीण काम आहे.
अधिकाधिक लसी या अशा व्हायरसपासून सुरक्षा करतात जे शरीरामध्ये श्‍वासोच्छवासाद्वारे किंवा गैस्ट्रो-इंटसटाइनल सिस्टमद्वारे दाखल होतात. तर एचआयव्हीचे संक्रमण गुप्तांग किंवा रक्ताद्वारे होते. जनावरांवर व्हायरस आणि लसीची चाचणी केल्यानंतर माणसांसाठी औषध बनविले जाते. मात्र, दुर्भाग्य म्हणजे एचआयव्हीसाठी असे काहीच यश आलेले नाही. फक्त एकच जमेची बाजू म्हणजे कोरोना एड्ससारखा डीएनएमध्ये लपत नाही. यामुळे तो शोधला जाऊ शकतो.